याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार: वाघोली, केसनंद परिसरात पेट्रोलिंग करत असताना सहा. पोलीस निरीक्षक खोसे यांना दोन पांढऱ्या रंगाच्या पिकअप (एमएच ४२ एम ८५०६ व एमएच ४२ एम ८८०६) मधून गावठी हातभट्टीची दारू बेकायदेशीर विक्रीकरिता वाघोली येथील केसनंद फाट्यावरून पुण्याकडे जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. लोणीकंद पोलिसांनी केसनंद फाटा येथे मिळालेल्या माहितीच्या आधारे दोन पिकअप गाड्या थांबवून चालकांची विचारपूस करून तपासणी केली असता दोन्ही पिकअप मध्ये गावठी हातभट्टीची दारू असलेल्या प्लास्टिक कॅन आढळून आल्या. पोलिसांनी चालकांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता उरुळी कांचन येथून आणली असून येरवडा
(पुणे) येथे विक्रीसाठी घेऊन जात असल्याची कबुली दिली. नीतेश भालसिंग राठोड (वय २१, रा. उरुळी कांचन, ता. दौड) व इंद्रजीत मारुती राठोड (वय २२, रा. उरुळी कांचन, ता. दौंड) या दोघांवर लोणीकंद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गावठी दारू असलेल्या प्लास्टिक कॅनसह ७ लाख ९२ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.