नसरापूर : वेगवान वाहतुकीसाठी जिल्ह्यातील प्रस्तावित चक्राकार मार्गाला (रिंगरोड) केळवडे येथील शेतकºयांनी विरोध दर्शविला आहे. रिंगरोडचा आराखडा तयार करताना आमच्या जमिनी यात जात असून, आमचा कुठलाही विचार प्रशासनाने केला नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. या रस्त्यासाठी आम्ही आमची इंचभरही जमीन देणार नाही. त्यामुळे या रस्त्याच्या आखणीचा पुनर्विचार करावा अन्यथा मोठे आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.जिल्ह्यात वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी रिंगरोड प्रस्तावित आहे. हा रस्ता भोर तालुक्यातील केळवडे येथून जातो. केळवडे हे गाव हे कृषी क्षेत्रात अग्रेसर आहे. ७० टक्के नागरिकांचा व्यवसाय शेती आहे. त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. येथील शेतकऱ्यांना ० =४० व ० =६० आर असे कमी क्षेत्र आहे. त्यांच्या या जमिनीवरून रिंगरोड प्रस्तावीत झाला असल्याने त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार आहे. यासाठी नसरापूर येथे ग्रामस्थांनी मंगळवारी (दि. ५) बैठकीचे आयोजन केले होते. या वेळी शासनाने रिंगरोडसाठी सर्व शेतकºयांशी चर्चा न करता परस्पर निर्णय घेतलेला आहे. रस्त्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी शासनाने हस्तांतरित करु नये. अन्यथा येथील शेतकरी उग्र आंदोलन करतील, असा इशारा या बैठकीत शेतकऱ्यांनी दिला. या वेळी शिवसेना सहसंपर्कप्रमुख कुलदीप कोंडे, बळीराजा शेतकरी संघटनेचे श्यामसुंदर जायगुडे, सरपंच शांताराम जायगुडे, माजी सरपंच संदीप खुळे, विलास कोंडे, बाळासाहेब कोंडे, राजेंद्र कोंडे, महेश मरळ, जितेंद्र कोंडे, रवींद्र धुमाळ, जीवन कोंडे, मोहन धुमाळ, सचिन कोंडे, संपत कोंडे आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.........पुणे जिल्ह्यातील रा. म. लगेच या केळवडे- कांजळे - खोपी- कुसगाव - रांजे (तालुका भोर) रहाटावडे - कल्याण-घेरा सिंहगड - खामगाव मावळ - वरदाडे -मालखेड - मांडवी बुदुक - सांगरुण- बहुल्ली (तालुका हवेली) कातवडी - मुठा - मारणेवाडी - आंबेगाव - उरवडे कासार आंबोली - भरे - आंबडवेट - घोटावडे - रिहे - पडाळघरवाडी - जावळ - केमसेवाडी पिंपळोली (तालुका मुळशी) पाचाणे - चांदखेड बेबड ओहोळ धामणे - परंदवाड़ी व उर्स (मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाजवळ)(तालुका मावळ) येथे संपणाच्या या नवीन रस्त्याच्या आखणीस विशेष राज्य मार्ग म्हणून शासनाच्या वतीने मंजुरी देणार असल्याचे समजते........
अतिवृष्टी झाल्यामुळे येथील शेतकरी नुकसानीमुळे हतबल झाला आहे. त्यातच शासनाने केळवडे ते उर्से मार्गावरील रिंगरोडसाठी बाधित शेतकऱ्यांना विश्वासात न घेता भूसंपादन करण्याचा घाट घातला आहे. .केळवडे ते उर्से रिंगरोड संदर्भात शासनाकडून कोणतीही माहिती प्राप्त झाली नसून या रिंगरोडविरोधात केळवडे येथील ग्रामस्थ, बळीराजा शेतकरी संघटना यांनी आम्हास निवेदन दिले आहे.- राजेंद्र जाधव, प्रांताधिकारी, भोर.....
भूसंपादन झाल्यास येथील ८० टक्के शेतकरी भूमिहीन होणार आहेत. त्यामुळेच भूसंपादन करण्याचा प्रयत्न झाल्यास उग्र आंदोलन केले जाईल, असा इशारा उपस्थितांनी दिला...........केळवडे ते उर्से रिंगरोड संदर्भात शासनाने शेतकऱ्यांना विश्वासात न घेता रिंगरोडसाठी भूसंपादन करण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे ८० टक्के शेतकरी भूमिहीन होणार आहे.- श्यामसुंदर जायगुडे, संपर्कप्रमुख, बळीराजा शेतकरी संघटना