माळेगाव येथील आरोग्य वर्धिनी केंद्रात पंचेचाळीस वर्षांच्या पुढील सर्वांना सरसकट कोविड लस एक एप्रिलपासून देण्यात येत आहे. मात्र, लसीच्या तुटवड्यामुळे नागरिकांना हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे. या केंद्रात लसीकरणाचा बोजवारा उडाला आहे.
गेल्या तीन दिवसांपासून येथे लस उपलब्ध नव्हती. त्यामुळे आज सोमवार (दि. २६) रोजी आरोग्य वर्धिनी केंद्रात कोविड लस उपलब्ध झाली. ही माहिती मिळताच ग्रामस्थांची सकाळी सात वाजल्यापासून लस घेण्यासाठी झुंबड उडाली. दहा वाजता आरोग्य सेवकांनी लस देण्यास सुरुवात केली. तोपर्यंत दोनशेहून अधिक ग्रामस्थांनी गर्दी केली होती. या वेळी महिला व पुरुषांनी रांगा लावल्या होत्या. त्या दरम्यान अनेकांना सोशल डिस्टन्सिंगचा विसर पडला. लसीकरणाचा नंबर लावण्यावरून वाद निर्माण होत होते. ज्या रुग्णांना लस घ्यायची होती त्याचे नातेवाईक रांगेत उभे राहिल्याने संभ्रम निर्माण झाला.
सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. केंद्रावर पुरेशी लस देण्यात यावी. सकाळी दहाऐवजी साडेसात वाजल्यापासून लसीकरण करावे. रांगेत थांबताना सर्वांना उन्हाचा त्रास होत आहे. सकाळी लसीकरण सुरू केल्यास नागरिकांना सोयीचे होईल.
शौकत शेख, ग्रामस्थ
फोटो ओळी : माळेगाव आरोग्य वर्धिनी केंद्रावर लस घेण्यासाठी झालेली गर्दी.
२६०४२०२१-बारामती-१३