कुरकुंभ : कुरकुंभ (ता. दौंड) येथे ग्रामस्थ भुरट्या चोरांच्या धुमाकुळीने त्रस्त असून, छोट्या-छोट्या चोऱ्या तसेच घरफोड्यांच्या घटना रोजच होत असल्याचे निदर्शनास येत आहे. यापैकी काहीच तक्रारी पोलिसांकडे येत असल्याने या चोरांचा आत्मविश्वास भलताच बळावत चालला असल्याने पोलिसांना यांना जेरबंद करण्यासाठी तत्काळ कारवाई करण्याची गरज आहे.
याबाबत कुरकुंभ येथील नंदा ज्ञानदेव गायकवाड यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून, त्यांच्या बंद घरात जवळपास २० हजारांची चोरी झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. गायकवाड या कुरकुंभ येथील रहिवाशी असल्याने पोलिसांत तक्रार दिली आहे; अन्यथा बाहेरून आलेले कामगार पोलिसांत तक्रार देण्याच्या मानसिकतेत नसतात. त्यामुळे या घटना वारंवार होतात. कुरकुंभ येथील वाढत्या नागरीकरणाने अनेक ठिकाणी लोकवस्त्या नव्याने निर्माण झाल्या आहेत. परिणामी, विविध प्रकारच्या कामांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कामगार येथे वास्तव्यास आहेत. हे कामगार कामावर गेल्यानंतर बंद घरातून मिळेल ते चोरण्याचा प्रकार उघडकीस येत आहे. रात्री कामाची सुटी झाल्यानंतर घरी जाणाऱ्या कामगारांना लुटण्याचेदेखील प्रकार वारंवार घडत असताना पोलीस याला आळा घालण्यात अयशस्वी ठरत आहेत. त्यामुळे हे चोर काही वेळा अगदी दिवसादेखील चोऱ्या करतात. वारंवार होत असलेल्या चोऱ्या पोलिसांसमोर आव्हान उभे करीत आहेत.
भुरट्या चोरांची टोळी सक्रिय
औद्योगिक क्षेत्रामधील कामगार या चोरांच्या केंद्रस्थानी असून कामावरून रात्री माघारी येताना किंवा रात्री कामगार एकटा घरी असताना हे चोर या कामगारांना लुटत असल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत.