जिल्ह्यात साधेपणाने जोगेश्वरी माता व श्री भैरवनाथाचा विवाहसोहळा
लोकमत न्यूज नेटवर्क
मोरगाव : पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सर्वत्र सकाळपासूनच लगीनघाईची गडबड सुरू होती ती विवाह निमित्ताने. काही मोजक्याच गावपुढारी मंडळींच्या उपस्थितीत विवाह संपन्न करायचा; मात्र विवाह मुहूर्त ढळू नये याची काळजी सर्वच घेत होते. वऱ्हाडी मंडळी अवघी पाच-सहा. ही मंडळी सकाळपासूनच या विवाहाची वाट पाहत होते. हा विवाह होता जोगेश्वरी माता व श्री भैरवनाथ यांचा. सोमवारी दुपारी १२ वाजता तर काही गावांत सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास या मुहूर्तावर तालुक्यात विवाह मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.
बारामती तालुक्यासह पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश गावागावांतील ग्रामदैवत म्हणून भैरवनाथ देवता पुजली जाते. सलग दुसऱ्या वर्षी कोरोना या विषाणूजन्य आजारामुळे भैरवनाथ व जोगेश्वरी मातांच्या विवाहानिमित्ताने ग्रामस्थ व भाविक मंडळी लग्नसभारंभात भाग घेता आला नाही. मोरगाव, मुर्टी, तरडोली, लोणी भापकर, काऱ्हाटी, जळगाव सुपे, देऊळ्गाव रसाळ तसेच पुरंदर तालुक्यातील वाल्हे, मांडकी आदी सर्वच गावांत विवाह संपन्न झाला.
श्री भैरवनाथाचे मंदिर ज्या गावात आहेत अशा सर्वच गावांत संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात कालाष्टमी निमित्ताने हा विवाह संपन्न झाला आहे. सायंकाळी लोणी भापकर येथे हा विवाह संपन्न होऊन दरवर्षी भैरवनाथ यात्रेस सुरुवात होते. मात्र, यंदा केवळ विवाह सोहळा संपन्न झाला असून यात्रा रद्द केली आहे. तालुक्याच्या ग्रामीण भागात अखंड समाजाचे ग्रामदैवत समजले जाणाऱ्या भैरवनाथांचा विवाह काही गावांमध्ये दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास, तर काही गावांत सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास संपन्न झाला. यंदा लगीनघाई असून नेहमी गजबजणाऱ्या गावांत कोरोना या आजारामुळे शुकशुकाट पहावयास मिळत होता.