भुलेश्वर : पुरंदर तालुक्यात होत असलेल्या छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाची जागा बदलण्यात आली असून, विमानतळाबाबत बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. यामध्ये पुरंदरमधील रिसे, पिसे, राजुरी, नायगाव, पांडेश्वर या पाच गावांबरोबर आता बारामती तालुक्यातील भोंडवेवाडी, चांदगुडेवाडी, आंबी खुर्द या तीन गावांचाही समावेश करण्यात आला आहे.
यासाठी पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील पांडेश्वर येथे विमानतळाला विरोध व पुढील दिशा ठरविण्यासाठी विमानतळ संघर्ष समितीच्या वतीने बैठक आयोजित केली होती. या वेळी आठही गावांतील काही ग्रामस्थ उपस्थित होते. जीव गेला तरी चालेल, पण विमानतळासाठी एक इंचही जागा देणार नसल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील राजुरी, रिसे, पिसे, नायगाव, पांडेश्वर या गावांतील २३६८ हेक्टर व बारामती तालुक्यातील भोंडवेवाडी,चांदगुडेवाडी ,आणि आंबी खुर्द या तीन गावांतील ७०० हेक्टर जमिनीवर नवीन प्रस्तावित विमानतळ होणार आहे. विमानतळास तीव्र विरोध दर्शवण्यासाठी आज पांडेश्वर येथे पुरंदर विमानतळ संघर्ष समिती व निवडक ग्रामस्थांची बैठक घेण्यात आली.
शासन आमच्यावर विमानतळ लादत असेल तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पुरंदर विमानतळ संघर्ष समितीचे अध्यक्ष गणेश मुळीक यांनी दिला आहे.
या बैठकीत दोन्हीही तालुक्यांतील प्रमुख शेतकऱ्यांनी विमानतळास तीव्र विरोध दर्शवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील म्हणाले की मी स्वतः शेतकरी आहे. आपल्या जमिनी कोणत्याही परिस्थितीत द्यायच्या नाहीत. आमचा जीव गेला तरी जमिनी द्यायच्या नाहीत. वेळ प्रसंगी आंदोलने, मोर्चे काढणार आहोत.
पुरंदर विमानतळ संघर्ष समितीचे अध्यक्ष गणेश मुळीक म्हणाले, शासनाला पूर्णपणे चुकीची माहिती पुरविली असून विमानतळाचा घाट आपल्यावर घालण्याचा प्रयत्न लोकप्रतिनिधी करत आहेत. यासाठी ग्रामसभेचे ठराव घ्या. आपण लोकशाही व न्यायालयीन मार्गाने सर्व लढाया लढणार आहोत.
शशिभाऊ गायकवाड म्हणाले, लोकशाही व कायदेशीर मार्गाने लढा देऊ. ‘सौ सोनार की एक लोहार की’ या पद्धतीने एकदाच मोठा मोर्चा काढू व शासनाला विमानतळ हटविण्यास भाग पाडू. राजुरी गावचे अंकुश भगत म्हणाले शेतकऱ्यांच्या बागायती जमिनी घेऊन विमानतळ नको. बागायती जमिनी जिरायती ठरवून विमानतळ लादले आहे.
विश्वास आंबोले म्हणाले की ग्रामस्थांचा विरोध असेल तर विमानतळ होणार नाही, असा आमदारांनी शब्द दिला आहे. नायगावचे हरिदास खेसे म्हणाले की पुरंदर तालुक्यातच विमानतळ नको आहे. नायगावच्या वतीने विमानतळास पूर्ण विरोध आहे.
पांडेश्वर येथील संजय जगताप म्हणाले की जनाई शिरसाई योजना व पुरंदर उपसा सिंचन योजना यामुळे येथील क्षेत्र बागायती झाले आहे. शासनाला चुकीची माहिती दिली गेली आहे. यामुळे या ठिकाणी विमानतळाचा घाट घातला आहे. अशोक गायकवाड म्हणाले की शेतकऱ्यांनी आपली पीक पाहणी सातबारा उताऱ्यावर लावून घ्या व विमानतळास तीव्र विरोध करा. सदाशिव चौंडकर म्हणाले की आंदोलन करण्याचा लवकरात लवकर निर्णय घ्या. शैलेश रोमन म्हणाले की आपला सर्वांचा विमानतळाला विरोध असताना विमानतळ करतातच कसे? विमानतळास तीव्र विरोध दर्शवण्यासाठी युवकांनी आत्महत्या कराव्या की काय?
ॲड. किरण साळुंके म्हणाले की विमानतळसंदर्भात आपण सर्वांशी पत्रव्यवहार केले आहेत. ॲड. भरत बोरकर म्हणाले, की आमच्याकडे बागायती क्षेत्र असून अधिकाऱ्यांनी डोळे झाकून सर्व्हे केले आहेत का? बागायती क्षेत्र, फळबागा, गाई यांची संख्या जास्त आहे. बारामती तालुक्यातील तिन्ही गावांचा विमानतळाला विरोध आहे.
पोपट खैरे म्हणाले की आम्ही बारामतीतील तिन्ही गावांचे ग्रामस्थ विमानतळाच्या विरोधात आहोत.
महेश कड म्हणाले की बागायती जमिनी व जिरायती जमिनी यांची तफावत असणारी माहिती शासनाला दिली आहे.
या वेळी उपस्थित ग्रामस्थांच्या वतीने विमानतळाचा तीव्र निषेध करण्यात आला.
या वेळी संतोष कोलते, प्रदीप खेसे, सुभाष चौंडकर, विपुल भगत, वैभव थिकोळे, शफीक शेख, सत्यवान भगत, महेंद्र खेसे, योगेश घाटे, प्रवीण कदम आदी उपस्थित होते.
पांडेश्वर येथे विमानतळ संघर्ष समितीची बैठक घेण्यात आली.