पुणे : ड्रग तस्कर ललित पाटील याला ससून रुग्णालयातून पळून जाण्यासाठी मदत करणारा रोझरी संस्थेचा संचालक विनय आरहानाला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांनी एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.
२५ ऑक्टोबर रोजी आरहानाला अटक करण्यात आली होती. त्याच्याविरुद्ध ४ डिसेंबर रोजी न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्याने अॅड. भाग्यश्री सोरटूर यांच्यामार्फत जामीन मिळवण्यासाठी अर्ज केला होता. आरहाना १६ ऑक्टोबर २०२३ रोजी ससून रुग्णालयातील कैद्यांच्या उपचार कक्षात (वॉर्ड क्रमांक १६) दाखल झाला होता. त्यानंतर १० नोव्हेंबर रोजी त्याला ससून रुग्णालयातून सोडण्यात आले. आरहाना ललित पाटीलच्या संपर्कात नव्हता.
आरहानाचा मोटारचालक दत्ता डोके ललितच्या संपर्कात होता. त्याला पोलिसांनी अटक केली. डोकेची पोलिसांनी चौकशी केली. त्याचा जबाब नोंदवून घेण्यात आला. आरहाना याने ललितला पळून जाण्यास मदत कर, असे सांगितले नव्हते, असा जबाब डोकेने दिला होता, असे आरहानाचे वकील अॅड. भाग्यश्री सोरटूर यांनी युक्तिवादात सांगितले. ललित पाटील ससून रुग्णालयातून पसार झाल्याप्रकरणात आरहानाचा संबंध नसल्याचे दिसून आले आहे. याप्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून, जामीन मिळाल्यानंतर आरहाना पुराव्याशी छेडछाड करणार नाही. आरहाना साक्षीदारांवर दबाब टाकणार नाही, असे अॅड. सोरटूर यांनी युक्तिवादात नमूद केले. बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने आरहानाला जामीन मंजूर केला.