पुणे :महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी वायदा करूनही महाराष्ट्र शाहीर परिषदेच्या कार्यक्रमाला दांडी मारल्याने परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र पुण्यात एकाच दिवसात चित्रपट आणि नाटक बघत सांस्कृतिक आनंद लुटल्याचे परस्परविरोधी दृश्य बघायला मिळाले.
महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या पुणे शहरात नेहमीच विविध कार्यक्रम संपन्न होत असतात. परंतु शहरात सोमवारी चर्चा होती सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आलेल्या आणि न आलेल्या नेत्यांबद्दल. राज्यांचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या वेळेनुसार शाहीर परिषदेच्या सुवर्ण महोत्सवाची आखणी करण्यात आली होती. ते येणार असल्याने दोन दिवसांचा कार्यक्रम एक दिवसावर आणण्यात आला होता. मात्र तरीही ऐनवेळी त्यांनी हजेरी न लावल्याने अध्यक्ष शाहीर दादा पासलकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून शाहीर आले असल्याने आयोजक म्हणून अशी वेळ कोणावरही येऊ नये अशा शब्दात त्यांनी आपली निराशा व्यक्त केली.
दुसरीकडे पवार यांनी सकाळी अरुण साधू लिखित कादंबरीवर आधारित झिपऱ्या हा चित्रपट पत्नी प्रतिभाताई आणि मान्यवरांच्या उपस्थितीत बघितला. संध्याकाळी त्यांनी राजकुमार तांगडे लिखित आणि नंदू माधव दिग्दर्शित शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला या नाटकाच्या ७०१व्या प्रयोगाला खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह हजेरी लावली. पवार यांचे नाट्यप्रेम सर्वश्रुत आहेच. मात्र तरी एकाच दिवशी शहरात घडलेल्या या दोन योगायोगांची चर्चा रंगलेली बघायला मिळाली.