जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन, रवींद्र धंगेकरांवर गुन्हा, BJP ने पैसे वाटल्याचा केला होता आरोप
By नम्रता फडणीस | Published: May 14, 2024 07:26 PM2024-05-14T19:26:36+5:302024-05-14T19:29:33+5:30
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात जमावबंदीचा आदेश लागू आहे. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून रविवारी (दि. १२) रात्री पैसे वाटप होत असल्याचा आरोप करून धंगेकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी सहकारनगर पोलिस ठाण्याच्या परिसरात आंदोलन केले...
पुणे : भाजपकडून पैसे वाटप होत असल्याचा आरोप करून सहकारनगर पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन केल्याप्रकरणी महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यासह ३५ ते ४० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यात रवींद्र धंगेकर, नितीन कदम, सचिन देडे, अक्षय माने, साकीब आबाजी, संतोष पंडित, अनिल सातपुते यांच्यासह ३५ ते ४० कार्यकर्त्यांचा समावेश आहे. याबाबत पोलिस कर्मचारी अभिजित बालगुडे यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून धंंगेकर यांच्यासह कार्यकर्त्यांविरुद्ध भादंवि कलम १४३, १४५, १४९, १८८, महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम १३५, लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१ चे कलम १२६ नुसार हा गुन्हा नोंद दाखल केला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात जमावबंदीचा आदेश लागू आहे. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून रविवारी (दि. १२) रात्री पैसे वाटप होत असल्याचा आरोप करून धंगेकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी सहकारनगर पोलिस ठाण्याच्या परिसरात आंदोलन केले. त्यावेळी पोलिस ठाण्याच्या आवारात शेकडो कार्यकर्ते जमा झाले होते. धंगेकर यांच्या ठिय्या आंदोलनाने परिसरात तणाव निर्माण झाला होता. जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी धंगेकर यांच्यासह ३५ ते ४० कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. सहकारनगर पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.