सांगवी: येथे नियमांचे उल्लंघन करणा-या तीन दुकानदारांवर अखेर बारामती तालुका पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुभार्वामुळे शासनाने राज्यभरात कडक निर्बंध लागू केले आहेत. मात्र, सांगवीत त्याची पुरेपूर अंमलबजावणी होताना दिसून आली नाही. सध्या सांगवीत कोरोना रुग्णांची संख्या १८२ झाली आहे. तरीही नागरिकांना गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. सांगवी येथील चांदणी चौक, बसस्थानक परिसरात नागरिक नियमांचे उल्लंघन करत गर्दी करत आहेत.
सांगवी येथील बडे व्यावसायिकच शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत या निर्बंधाला धुडकावून लावत असल्या बाबत मंगळवारी (दि. ६) रोजी ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. याची दखल घेत ग्रामीण पोलिसांनी नियमांचे उल्लंघन करणा-या होटेल, चप्पलचे दुकान व एका खेळण्याच्या दुकान चालकांविरोधात त्यांचे रिपोर्ट तहसीलदार यांना पाठवून कारवाई करणार असल्याचे सांगण्यात आले. यामुळे आता दुकानदार व नागरिकांनी चांगलाच धसका घेतला आहे.
ग्रामपंचायत कडून दवंडी देऊन नियमांचे पालन करण्याबाबत सूचना देण्यात येत आहे. तरीही अनेक नागरिक व दुकानदार नियमांचे उल्लंघन करत असल्याचे आढळून येत आहे. देखील ग्रामपंचायत प्रशासन कोणत्याही प्रकारची कारवाई करताना दिसून येत नाही. यामुळे ग्रामपंचायतने ठोस उपाययोजना करून उल्लंघन करणा-या दुकानदारांवर कारवाईची मोहीम आखणे आवश्यक आहे. तसेच ग्रामीण पोलिसांनी देखील आता नियम मोडणा-या दुकानदार व नागरिकांवर कारवाईत सातत्य राहणे गरजेचे आहे.
सांगवी येथील चांदणी चौकात सहानंतरदेखील मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसून येते.
०९०४२०२१-बारामती-०२