मांडवगण फराटा : मांडवगण फराटा ( ता. शिरूर ) व परिसरामध्ये असलेल्या बिबट्यांना पकडण्यासाठी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांबरोबरच या परिसरातील तरुण व ग्रामस्थ गेले आठ ते दहा दिवसांपासून अहोरात्र मेहनत घेत होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले. सोमवारी रात्री वडगाव रासाई शिवारात एक बिबट्या पिंजर्यात अडकला. पकडलेल्या या बिबट्याची माणिकडोह येथील बिबट्या निवारण केंद्रात रवानगी करण्यात आली आहे. शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील मांडवगण फराटा (ता. शिरूर) परिसरामध्ये अनेक बिबट्यांचा वावर असून, बिबट्यांना जेरबंद करण्यात वन विभाग मात्र अपयशी ठरत होता. एक महिन्याच्या कालावधीत या ठिकाणी दोन लहान मुलांचा बिबट्याने बळी घेतला आहे. या परिसरातील बिबट्यांना पकडण्यासाठी वन विभागाने पंचवीस पिंजरे लावले, पिंजर्यात बिबट्या साठी भक्ष्य ठेवण्यात येत होते, तसेच थर्मल कॅमेरे बसविण्यात आले, रात्रीच्या वेळी ड्रोनच्या सहाय्याने टेहळणी केली तरीही बिबटे दिसून येत नव्हते. त्यामुळे बिबटे कधी पकडले जाणार आणि त्यांचा उपद्रव कधी संपणार, असे प्रश्न ग्रामस्थ वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना विचारत होते. या परिसरात बिबट्यांनी वारंवार हल्ले करून अनेक शेळ्या, कुत्री ठार केली आहेत. महिनाभरापूर्वी एक तसेच दहा बारा दिवसांपूर्वी दुसऱ्या लहान मुलाचा बळी बिबट्याने घेतला होता. त्यामुळे ग्रामस्थ भीतीच्या छायेत वावरत होते. बिबट्यांमुळे शेतीची दैनंदिन कामेही रखडत आहेत. ग्रामस्थांना दिवसाही घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. कधी बिबट्या हल्ला करेल, याचा नेम नाही. शेतीची कामे देखील थांबली आहेत. रात्रीचा प्रवास तर चारचाकीशिवाय करताच येत नाही. ऊसतोडीसाठी कामगार येण्यास धजावत नाहीत. पाहुणेमंडळी तर यायलाच नको म्हणत आहेत. अनेक बिबट्यांना मधील एक बिबट्या पिंजर्यात जेरबंद झाल्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून या परिसरातील बाकीच्या बिबट्यांना पकडण्यासाठी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावेत अशी मागणी श्री वाघेश्वर ग्रामविकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजीव फराटे पाटील यांनी केली आहे.
शिरूर तालुक्यात शेळी, कुत्रे यांच्यासहीत लहान मुलांचा बळी घेणारा हिंसक बिबट्या जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2024 4:24 PM