पुणे: दिवाळीत फाेडलेले फटाके तसेच फराळाचे तळलेले अन्न पदार्थ खाल्ल्यामुळे माेठयांसह लहान मुलांमध्ये श्वसनविकार, पाेटाच्या तक्रारी व विषाणूजन्य ताप असलेल्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. महापालिकेच्या आणि खासगी रुग्णालयांत या रुग्णांची संख्या वाढली आहे. यासाठी काही काळजी घेण्यासह संतुलित आहाराचे सेवन करण्याचा सल्ला डाॅक्टरांनी दिला आहे.
दिवाळीतील फटाक्यांमुळे मुलांसह माेठयांना श्वसनविकाराची समस्या वाढली आहे. फटाक्यांच्या माध्यमातून येणाऱ्या प्रदूषकांच्या उच्च पातळीच्या संपर्कात आल्यानंतर मुलांना दमा किंवा ब्राँकायटिस यांसारख्या श्वसनाच्या समस्यांचा त्रास उद्भवू शकतो. मोठा आवाज आणि मोठ्या प्रमाणातील प्रकाशाने डोकेदुखी, मानसिक ताण आणि झोपेसंबंधीच त्रास हाेत असल्याचेही दिसून आले आहे. तसेच या सणासुदीच्या काळातील चुकीच्या आहाराच्या सवयींमुळे आरोग्यावर नकारात्मक परिणाम होत असल्याचेही दिसून आलेले आहे.
मिठाई व तळलेल्या पदार्थाचा परिणाम
या काळात मोठ्या प्रमाणात मिठाई आणि तळलेले फराळाचे पदार्थ यांची रेलचेल असते. यावर चांगलाच तावही मारला जाताे. अशा पदार्थांच्या अतिसेवनामुळे संपुर्ण आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. यामध्ये प्रक्रिया केलेले पदार्थ, शर्करायुक्त पदार्थांचे सेवन केल्याने वजन वाढते आणि दात किडतात आणि भविष्यात मधुमेहासारखी समस्या निर्माण होण्याचा धोका वाढतो. त्याचप्रमाणे, तेलकट पदार्थांचे जास्त सेवन केल्याने आम्लपित्त, पोट फुगणे, छातीत जळजळ आणि अपचन यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.
तापामध्ये झाली वाढ...
दिवाळीनंतर लगेचच विषाणूजन्य तापामध्ये 5 ते 10 टक्के वाढ झाली आहे. हे प्रमाण मागील वर्षाच्या तुलनेत अधिक आहे. खोकला, सर्दी, घसा खवखवणे, ताप, उलट्या होणे अशा सामान्य तक्रारी आढळून येत. असल्याची माहिती, लुल्लानगर येथील नवजात तथा बालरोगतज्ञ डॉ. वृषाली बिचकर यांनी दिली.
दिवाळीनंतरच्या कालावधीत मुलांमध्ये ब्राँकायटिसच्या रुग्णांमध्ये वाढ दिसून येते, तर प्रदूषणामुळे दम्याच्या रुग्णांचीही संख्या वाढत आहेत. खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होणे अशा सामान्य तक्रारी घेऊन मुले रुग्णालयात दाखल होत आहेत. यासाठी प्रदूषण आणि फटाक्यांच्या धुराचा प्रादुर्भाव कमी करणे, मास्कचा वापर करणे तसेच धूळ, परागकण, प्राण्यांची केस किंवा श्वासोच्छवासाच्या समस्यांना कारणीभूत असलेल्या कोणत्याही गोष्टींकडे दुर्लक्ष करु नये. - डॉ. सम्राट शाह, इंटरनल मेडिसिन एक्स्पर्ट
काय काळजी घ्याल?
- मिठाई आणि तळलेले पदार्थ मर्यादित प्रमाणात करावे.- फराळ तसेच मिठाईला पौष्टीक करण्यासाठी त्यात काजू, तेलबिया आणि गूळाचा वापर करा.- सकाळी चालायला जाताना मास्कचा वापर करावा- सकाळच्या वेळी हवेत धुरके दिसून आल्यास ज्यांना दम्याचा त्रास आहे त्यांनी फिरायला जाणे टाळावे