चंदू बोर्डे : खासदार शरद पवार यांच्याहस्ते पुण्यात सन्मान
पुणे : कर्णधारपद आणि आघाडीचा फलंदाज या दोन्ही कठीण जबाबदाऱ्यांमुळेच विराटची गेल्या काही दिवसांतील कामगिरी खालावली आहे; मात्र दडपण कमी झाल्यावर त्याची कामगिरी नक्की सुधारेल आणि आपल्याला पूर्वीचा विराट कोहली अनुभवता येईल, असे मत माजी क्रिकेटपटू चंदू बोर्डे यांनी व्यक्त केले.
पुणा क्लब येथे मंगळवारी ‘सॅल्युट टू द लिजेंड चंदू बोर्डे’ या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी बोर्डे यांचा सत्कार केला. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, प्रत्येक खेळाडूच्या कारकिर्दीत असे चढ-उतार येतच असतात. त्यामुळे विराटच्या खालावलेल्या कामगिरीमुळे आश्चर्य वाटत नाही. तो भविष्यात भारतीय संघासाठी आणखी मोलाचे योगदान देईल. यावेळी द्वारकानाथ संझगिरी यांनी गप्पांमधून बोर्डे यांचा क्रिकेटमधील जीवनपट उलगडला.
यावेळी बोर्डे यांनी विजय हजारे, नरी काॅन्ट्रँक्टर, बापू नाडकर्णी, विजय मांजरेकर, विनू मंकड, सदू शिंदे, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड अशा अनेक खेळाडूंच्या आठवणींना उजाळा दिला. १९५८ मध्ये वेस्ट इंडिजचा संघ भारतीय दौऱ्यावर असताना बोर्डे यांना भारतीय संघात स्थान देण्यात आले. दोन्ही कसोटींमध्ये त्यांची कामगिरी जेमतेम होती. त्यामुळे तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीत त्यांना संघात स्थान मिळाले नाही. अखेरच्या कसोटीत बोर्डे यांनी पहिल्या डावात शतक (१०९) झळकावले. तर दुसऱ्या डावात ९६ धावांवर ते हीट विकेट झाले. याबाबत बोर्डे म्हणाले की, हूकचा फटका लगावताना पाय स्टंपला लागून बाद झाल्यामुळे शतक हुकले. यावेळी वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांची दहशत जवळून अनुभवल्याचेही ते म्हणाले.
चंदू बोर्डे म्हणाले की, ऋतुराज गायकवाड उत्तम फलंदाज आहे. काही सामन्यांमधील त्याची फलंदाजी आश्वासक आहे. त्यामुळे त्याला भारतीय संघात स्थान मिळाल्यास आश्चर्य वाटू नये. ऋतुराजसारख्या खेळाडूंचीच भारतीय संघाला गरज आहे.
अमिताभ बच्चन अन् राज कपूर
दिल्लीतील कसोटी सामन्यात शतक झळकावल्यानंतर बोर्डे यांना अमिताभ बच्चन यांनी उचलले होते. याबाबत खुद्द अमिताभ यांनीच माहिती दिली होती. त्यानंतर मुंबईतील सामन्यानंतर राज कपूर यांनी बाेर्डे यांना उचलून घेतले होते; मात्र त्यावेळी हरवलेली बॅट आजपर्यंत मिळाली नसल्याच्या आठवणीला बोर्डे यांनी उजाळा दिला.
बोर्डे यांचे मोलाचे योगदान - शरद पवार
भारतीय क्रिकेटच्या इतिहासात चंदू बोर्डे यांचे योगदान कधीही न विसरण्यासारखे आहे. त्यांच्यामुळेच भारताला आतापर्यंत अनेक मोलाचे खेळाडू मिळाले. भारतीय क्रिकेट संघाचा अध्यक्ष असतानाही कधीही कोणत्याही खेळाडूचे नाव सुचविले नाही. आज अनेक माजी खेळाडूंनी योगदान दिल्यामुळे तळागाळातील खेळाडू पुढे येत आहेत. भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी हा निश्चितच अभिमानास्पद क्षण आहे, असेही ते म्हणाले.
फोटो - चंदू बोर्डे - १