लक्ष्मण मोरेपुणे : कधी एटीएम कार्डचा पीन क्रमांक विचारुन तर कधी कार्ड क्लोनिंग करुन... कधी अकाऊंट हॅक करुन तर कधी बँकेतील अधिकारी असल्याचे भासवून ऑनलाईन फ्रॉडद्वारे लाखो रुपयांची फसवणूक केली जाते. परंतू, स्वस्त दरात कांदे विकण्याची ‘फेसबुक’वर जाहिरात करुन एका महिलेला ऑनलाईन गंडा घालण्यात आला आहे. राज्यभरात गगनाला भिडलेल्या काद्यांच्या दराने सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतानाच त्याच परिस्थितीचा फायदा उचलत अशा प्रकारे अनेकांची फसवणूक करण्यात आली आहे. यासाठी सोशल मिडीयाचा खुबीने वापर करण्यात आला आहे. या महिलेने यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून राज्यामध्ये कांद्याचे दर प्रचंड वाढलेले होते. स्वयंपाकामध्ये अत्यंत महत्वाचा घटक असलेला कांदा ८०-९०-१००-१५० अशा वाढता-वाढता वाढे सूत्राने वाढतच चालला होता. या काळात मध्यमवर्गीय आणि सर्वसामान्य नागरिक लागेल तेवढाच कांदा खरेदी करीत होती. कांदा खरेदी प्रमाण अगदी पाव किलोपर्यंत आले होते. याच काळात तक्रारदार महिलेला फेसबुकच्या ‘मार्केट प्लेस’वर स्वस्तात कांदे अशी जाहिरात दिसली. ही जाहिरात पाहिली असता अगदी ३० रुपये दराने कांदे मिळतील आणि तेही घरपोच असा मजकूर वाचल्यावर संबंधित महिलेने तेथे दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. त्या व्यक्तीने सर्व माहिती व्हॉट्सअॅपवर पाठवितो असे सांगितले. त्याने या महिलेला व्हॉट्सअॅपवर कांदे ३० रुपये दराने मिळतील; आम्ही घरपोच डिलिव्हरी देऊ अशी बतावणी केली. त्यानुसार, या महिलेने त्याला १५ किलो कांद्याची आॅर्डर दिली. त्याने कांद्याचे ४५० रुपये ‘गुगल पे’द्वारे पाठविण्यास सांगितले. त्यानुसार, हे पैसे त्याच्या खात्यात वर्ग करण्यात आले. पैसे मिळताच त्या व्यक्तीने संपर्कच बंद केला. बरेच दिवस कांदे न मिळाल्याने त्यांनी त्याच्याशी संपर्क केला असता त्याने लगेच कांदे पाठवितो असे सांगितले होते. परंतू, त्यानंतर त्याने महिलेचा नंबर ब्लॉक केला. त्याच्याशी त्यामुळे संपर्क साधला जाईना. त्याचा नंबर सुरु आहे व अद्यापही कांद्याची स्वस्तात विक्री करण्याच्या आमिषाने हा व्यक्ती फसवणूक करतो का हे तपासण्यासाठी त्यांनी दिराच्या नंबरवरून त्याच्याशी संपर्क साधला. तेव्हा त्याने त्या नंबरवर प्रतिसाद दिला आणि त्यांना यापूर्वी दिलेलीच माहिती दिली. हा सर्व प्रकार फसवणुकीचाच असल्याची खात्री पटल्यावर त्यांनी पोलिसांच्या सायबर शाखेच्या व नियंत्रण कक्षाच्या ई-मेलवर मेल पाठवित तक्रार केली आहे. आरोपीने अशाच प्रकारे अनेकांची फसवणूक केल्याची शक्यता असून हा लाखोंचा ‘आॅनलाईन अनियन फ्रॉड’असण्याची शक्यता आहे. या अर्जाची गंभीर दखल घेऊन कारवाईची मागणी या महिलेने केली आहे. पोलीस आता या कांदे प्रकरणाचा छडा लावतात की अर्ज दप्तरी दाखल होतो याकडे लक्ष लागले आहे.
‘व्हर्च्यूअल’ कांद्याने केला वांदा : मार्केट प्लेसद्वारे फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2019 11:30 PM
अगदी ३० रुपये दराने कांदे मिळतील आणि तेही घरपोच कांद्याचे दर वाढल्याचा उचलला फायदा
ठळक मुद्दे ‘मार्केट प्लेस’वर स्वस्तात कांदे अशी जाहिरात कांद्याचे दर वाढल्याचा उचलला फायदा