विधानसभा निवडणुकीत विरोधी काम केलेल्या 'जित्राबां'ना पक्षात पुन्हा प्रवेश नाही : अजित पवारांची टोलेबाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2021 05:57 PM2021-02-06T17:57:29+5:302021-02-06T19:23:23+5:30
स्टेजवर बसलेल्यांनी एक दिलाने काम केले असते तर विरोधी उमेदवाराचे डिपॉझिट जप्त झाले असते
इंदापूर : विधानसभा निवडणुकीत काहींनी निष्ठा बाजुला ठेऊन विरोधकांचे काम केले. अशा जित्राबांना पक्षात पुन्हा प्रवेश नाही, असा स्पष्ट इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.
इंदापूर येथे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या तालुका कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना अजित पवार यांनी तुफान टोलेबाजी केली. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता टिका करताना ते म्हणाले, जे भाजप शेतकयांच्या मुळावर उठलेले आहे अशा राजकीय पक्षात इंदापूरचा एक नेता जातो हे दुर्दैव आहे. मागील विधानसभा निवडणुकीमध्ये बºयाच लोकांना भाजप निवडून येईल असा चुकीचा अंदाज होता. म्हणून आजच्या स्टेजवर बसलेल्या लोकांनी वेगळी कामे केली. जर एक दिलाने काम केले असते तर राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या विरोधातील उमेदवाराचे डिपॉझिट जप्त झाले असते.
राष्ट्रवादीतून बाहेर गेलेले आप्पासाहेब जगदाळे यांच्यावर टिका करताना पवार म्हणाले, जिल्हा बॅँक, कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापतीपद अशी पदे जनतेची कामे करण्यासाठी दिली होती. मात्र, विधानसभा निवडणुकीत काहींनी निष्ठा बाजुला ठेऊन विरोधकांचे काम केले. ते जिकडे जातील तिकडचा पराभव होतो. त्यांचा पायगुणच तसा आहे. अशा जित्राबांना आता पक्षात प्रवेश नाही. यांनी कितीही नाही म्हणू द्या, मी नाहीच घ्यायचो म्हणतो. फक्त मला कुस्ती करायला लावून तुम्ही कपडे सांभाळू नका. तुम कुश्ती करो, हम कपडे सांभालेंगे असे नाही झाले पाहिजे.
आता आपल्याला नवी टीम तयार करायची आहे. मला पण ३० वर्षे राजकारणात झाली आहेत. त्यावेळी माझ्यासोबत तरुणांची टीम होती. तुम्ही काही काळजी करू नका. फक्त निर्व्यसनी राहा. ह्या बोटाची थुंकी त्या बोटावर करू नका. टोप्या फिरवून नका. दिलेला शब्द पाळा आणि शब्दाचे पक्के राहा. पवारसाहेबांशी एकनिष्ठ राहा.
इंदापूर शहरवासीयांनी नगर परिषद राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात दिली तर विकासच करून दाखवतो. नाहीतर नावाचा अजित पवार नाही असा शब्द देखील त्यांनी दिला. ते म्हणाले, इंदापूर तालुक्याची पंचायत समिती आपल्या ताब्यात नसताना देखील, जिल्हा परिषदेतील महत्त्वाची सभापतिपदे आपण इंदापूर तालुक्याच्या वाट्याला नेहमी दिलेले आहेत. त्यामुळे यंदा इंदापूर पंचायत समिती राष्ट्रवादी काँग्रेसची आली पाहिजे. राज्याचे ग्रामविकास मंत्री व पंचायत समिती संदर्भात निधी देणारी सर्व यंत्रणा राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचाराची आहे. त्यामुळे गावातील कोणीही गाफिल न राहता इंदापूर पंचायत समिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचाराची निर्माण करा.