पुणे: मुंबईत सुरू असलेल्या मेट्रोच्या कामांमुळे झालेल्या खड्डयात पाणी साचून डास झाले. त्यातून तिथे आमदार अनंत गाडगीळ तसेच चार वरिष्ठ अधिकाऱ्यांना स्वाईन फ्ल्यू व डेंग्यूच्या त्रासामुळे थेट रुग्णालयात दाखल करावे लागले. पुण्यातही मेट्रोचे काम सुरू आहे, मात्र मुंबईच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने या कामांमध्ये साचणाऱ्या पाण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. मेट्रो च्या सुरक्षा विभागाकडून आम्ही आधीच अशी काळजी घेत असल्याचा दावा करण्यात आला.मुंबईत मेट्रोचे भूयारी काम सुरू आहे. त्यासाठी तिथे बऱ्याच ठिकाणी खड्डे घेण्यात आले. त्यापैकी एका ठिकाणाच्या मागील बाजूलाच वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांची वसाहत आहे. त्या खड्डयांमध्ये पाणी साचून डास झाले. त्याचा त्रास होऊन एकाच वेळी ४ अधिकाऱ्यांना थेट रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यानंतर पालिकेचा आरोग्य विभाग दाखल झाला व त्यांनी मेट्रोला नोटीस बजावत त्या खड्डयांमध्ये औषधे टाकून डासांच्या सर्व अळ्या नष्ट केल्या. त्यानंतर सुरू असलेल्या सर्वच कामांची पाहणी करण्यात आली.पुण्यातही वनाज ते रामवाडी व पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट अशा तब्बल ३१ किलोमीटरचे मेट्रोचे काम सुरू आहे. यातील कर्वे रस्ता, पौंड रस्ता, व पुढे अन्य काही भाग रहिवासी आहे. त्याशिवाय कृषी महाविद्यालय ते स्वारगेट असा ५ किलोमीटरचा मार्ग भूयारी आहे. त्याचे काम सुरू व्हायचे असले तरी शाफ्ट ( भूयार खणणारे यंत्र आतमध्ये सोडण्यासाठी करावी लागणारी जागा) तयार करण्याचे काम मात्र स्वारगेट व कृषी महाविद्यालयाजवळ सुरू आहे. त्यातील स्वारगेटजवळचा परिसर निवासी आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून हे काम सुरू आहे. याठिकाणी मोठमोठे खड्डे घेण्यात आले आहेत. पाऊस आता सुरू झाला आहे. त्यामुळे या खड्डयांमध्ये पाणी साचून डासांची संख्या वाढण्याची दाट शक्यता आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने डासांच्या अळ्या नष्ट करण्यासाठी म्हणून नागरिकांना कोरडा रविवार पाळण्याचे आवाहन करण्यात येते, मात्र मेट्रोच्या या कामांकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. मेट्रोच्या कामांमुळे होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे आधीच नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यात या नव्या त्रासाची भर पडू नये असे त्यांचे म्हणणे आहे.
मेट्रोच्या कामामुळे नको डासांची गुणगुण : पालिकेचे दुर्लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2019 7:00 AM
मुंबईत सुरू असलेल्या मेट्रोच्या कामांमुळे झालेल्या खड्डयात पाणी साचून डास झाले...
ठळक मुद्देमुंबईच्या पार्श्वभूमीवर पुण्यात काळजी मेट्रो च्या सुरक्षा विभागाकडून आम्ही आधीच अशी काळजी घेत असल्याचा दावा एकाच वेळी डासांचा त्रास होऊन ४ अधिकाऱ्यांना थेट रुग्णालयात दाखल