लोकमत न्यूज नेटवर्क
नीरा : नीरा नदीच्या धरण साखळीमध्ये गेली तीन दिवस मुसळधार पाऊस पडत असून, त्यामुळे वीर धरणात पाण्याची आवक वाढत आहे. यामुळे धरण जवळपास पूर्णपणे भरले असून शुक्रवारी वीर धरण विद्युत गृहातून रात्री ८:०० वाजता ८०० क्युसेक वेगाने नीरा नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू झाला होता. शनिवारी पहाटे ६ वाजता हा विसर्ग वाढवून २१ हजार ५०५ क्युसेक करण्यात आला. सायंकाळी त्यात पुन्हा घट करून तो १३ हजार ९०४ क्युसेकने पाणी नीरा नदीत सोडण्यात येत असल्याची माहिती नीरा पाटबंधारे उपविभागीय अधिकारी शंकर मोघे यांनी दिली.
शनिवारी सकाळी वीर धरणातून २१ हजार ५०५ क्युसेकने पाणी सोडल्याने, नीरा येथील ब्रिटिशकालीन पुलाला पाणी लागले होते. तर प्रसिद्ध दत्त मंदिराच्या सभागृहाला दिवसभर पाणी लागले होते. वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर आलेला पूर पाहण्यासाठी नीरा पंचक्रोशीतील नागरिकांनी व शेतकरी नीरा नदीच्या दोन्ही तीरावर दिसून आले. नीरामाई महिला मंडळाच्या वतीने तसेच नीरेतील ग्रामस्थांनकडून नीरा नदीच्या पाण्याचे खणा-नारळाने ओटी भरून पूजन केले.
शुक्रवारी (दि. २३) वीर धरणाच्या विद्युत गृहातून रात्री ८:०० वाजता ८०० क्युसेकने नीरा नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू झाला होता. रात्री १२:३० धरणाच्या सांडव्यातून वाजता ४ हजार ६३७ क्युसेक वेगाने, २ वाजात विसर्गाच वेग वाढवून १२ हजार ४०८ क्युसेकने, तर शनिवार (दि. २४) पहाटे ६:०० वाजता २१ हजार ५०५ क्युसेकने, १०:०० वाजता विसर्ग वाढवत २२ हजार ४७५ क्युसेकने पाण्याचा विसर्ग दिवसभर सुरू होता. दुपारी धरण साखळीत पावसाचे प्रमाण कमी झाल्यावर दुपारी तीन वाजता सांडव्यातून सोडण्यात येणारा विसर्ग कमी करून १२ हजार ४०८ करण्यात आला. तर सायंकाळी पाच वाजता १३ हजार ९०४ क्युसेकने नीरा नदिच्या पात्रात विसर्ग सुरू होता.
फोटो : १ ) नीरा नदीच्या ब्रिटिशकालीन पुलावरून दिवसभर पाणी वाहत होत. (२) वीर धरणातून पाण्याचा विसर्ग सोडल्याने नीरा नदीच्या तीरेवरील प्रसिद्ध दत्तघाटाला पाणी लागले होते. (छाया : भरत निगडे)