पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी आरोपी विशाल अग्रवाल, शिवानी अग्रवाल आणि अशपाक मकानदारची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे. विशेष न्यायाधीश यू. एम. मुधोळकर यांनी तिघांना शुक्रवारी (दि. १४) चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
अग्रवाल दाम्पत्य आणि मकानदारच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. अपघातानंतर अल्पवयीन मुलाची वैद्यकीय तपासणी करण्यापूर्वी त्याच्या रक्ताचे नमुने बदलून पुरावा नष्ट करण्यासाठी अग्रवाल दाम्पत्य आणि अशपाक मकानदार यांच्यामध्ये एक महत्त्वाची ‘बैठक’ झाली होती. ही ‘बैठक’ नक्की कोठे झाली, तिथे कोण उपस्थित होते, तिथून ‘ससून रुग्णालया’च्या न्यायवैद्यक विभागाचा प्रमुख डॉ. अजय तावरे यांच्याशी संपर्क साधला होता का? तसेच आरोपी मकानदार हा रक्ताचे नमुने बदललेल्या ठिकाणासह ससून रुग्णालय, येरवडा पोलिस ठाणे आणि बाल न्याय मंडळ येथे हजर असल्याचे सीसीटीव्ही चित्रीकरण व साक्षीदारांकडे केलेल्या चौकशीत आढळून आले आहे.
रक्ताचे नमुने बदलून पुरावा नष्ट करण्याकरिता डॉक्टरांना देण्यासाठी मकानदार याने घेतलेल्या चार लाख रुपयांपैकी तीन लाख रुपये डॉ. श्रीहरी हाळनोरकडून जप्त करण्यात आले आहे, परंतु उर्वरित एक लाख रुपये कोणाला दिले, याबाबत तो माहिती सांगत नाही, असा युक्तिवाद अतिरिक्त सरकारी वकील अनिल कुंभार यांनी केला. याबाबतचा तपास करण्यासाठी आरोपी अशपाक मकानदार याला तीन दिवसांची कोठडी द्यावी, तर अग्रवाल पती-पत्नीची रवानगी न्यायालयीन कोठडीत करावी, अशी मागणी तपास अधिकाऱ्यांच्या वतीने सहायक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर यांनी न्यायालयाकडे केली.
अग्रवाल दाम्पत्याच्या वतीने ॲड. प्रशांत पाटील, ॲड. अबीद मुलाणी आणि मकानदारच्या वतीने ॲड. प्रसाद विजय कुलकर्णी यांनी बाजू मांडली. ‘आरोपींना पुरेशी पोलिस कोठडी झाली असताना तसेच अन्य आरोपींना न्यायालयीन कोठडी झाली असताना एकट्या मकानदारची पोलिस कोठडीत कशी चौकशी करणार आहेत,’ असा युक्तिवाद ॲड. कुलकर्णी यांनी केला. त्यानंतर न्यायालयाने बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून अगरवाल दाम्पत्यासह मकानदारची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली.