पुणे: विश्रांतवाडी भागात दहशत माजविणाऱ्या गुंडाविरुद्ध पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करण्याचे आदेश दिले. आदित्य नितीन बद्दप (वय २२, रा. साप्रस लाईन बाजार, पूर्व खडकी) असे या गुंडाचे नाव आहे. त्याची नागपूर कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
आदित्य बद्दप याच्याविरुद्ध शस्त्र बाळगणे, लूट, हाणामारी असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल झाले आहेत. त्याच्याविरुद्ध पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. त्याच्या वर्तणुकीत सुधारणा झाली नाही. गेल्या ५ वर्षामध्ये त्याच्याविरुद्ध ५ गंभीर गुन्हे दाखल आहेत. दहशतीमुळे नागरिक तक्रार करत नव्हते. बद्दप याच्याविरुद्ध झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करण्याचा प्रस्ताव विश्रांतवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय भापकर, गुन्हे प्रतिबंधक शाखेचे (पीसीबी) पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेदरे यांनी तयार केला.
संबंधित प्रस्ताव पोलीस आयुक्तांकडे पाठविण्यात आला. पोलीस आयुक्तांनी बद्दप याच्याविरुद्ध एमपीडीए कारवाई करण्याचे आदेश दिले. त्याला वर्षभरासाठी नागपूर कारागृहात ठेवण्यात येणार आहे. पोलीस आयुक्तांनी आतापर्यंत ६४ गुंडांविरुद्ध एमपीडीए कारवाई केली आहे.