पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्रांतवाडी पोलीस स्टेशन हद्दीत धानोरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अवैध जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार येरवडा पोलिसांचे स्वतंत्र पथक नेमून सापळा रचून ही मोठी कारवाई करण्यात आली. या कारवाईत जुगार चालवणारा विशाल पारखे तसेच जागामालक सुनील दीपक टिंगरे यांच्यासह जुगार खेळणाऱ्या २५ जणांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. या कारवाईत रोख रक्कम ७२ हजार ९८० रुपये, दोन चारचाकी तर तीन दुचाकी, अकरा मोबाइल व जुगाराचे साहित्य असा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
या मोठ्या कारवाईमुळे विश्रांतवाडी परिसरातील अवैध धंदेवाल्यांसह स्थानिक पोलिसांचेदेखील धाबे दणाणले आहेत. विश्रांतवाडी व परिसरात वारंवार कारवाई करून देखील चोरून छुप्या मार्गाने अवैध धंदे चालूच असतात. स्थानिक पातळीवर जेमतेम कारवाई केली जाते. मात्र या कारवाईत थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घातल्यानंतर बाहेरील पोलीस पथकाच्या मदतीने घातलेल्या छाप्यात जुगाराचा मोठा अड्डा पोलीस उपायुक्तांनी उद्ध्वस्त केल्यामुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहे. अशा प्रकारे चोरून करण्यात येणाऱ्या अवैध धंद्यांवर सातत्याने पोलिसांकडून कारवाई सुरूच राहणार असल्याचे यावेळी पोलीस उपायुक्त देशमुख यांनी स्पष्ट केले. परिमंडळ चार विभागात अशा प्रकारे अवैध धंदे सुरू असल्यास नागरिकांनी तत्काळ स्थानिक पोलिसांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे संपर्क साधावा, असे आवाहन या वेळी पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी केले आहे.