पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंगळवारी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर भारत विश्वगुरु व्हावा, तसेच जगाच्या कल्याणासाठी संकल्प करणार आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंगळवारी सकाळी ११ वाजता येणार आहेत. साधारण अर्धा तास ते मंदिरात असणार आहे. त्यांच्या आगमनाप्रसंगी स्वरुप वर्धिनीचे ढोलताशा पथकाचे वादन होईल. पारंपारिक मराठमोळ्या पद्धतीने त्यांचे स्वागत होईल. सुवासिनीच्या हस्ते औक्षण करण्यात येईल. त्यानंतर ते गणपतीची पूजा करतील.
याबाबत मंदिराचे मुख्य पुजारी मिलिंद राहुरकर गुरुजी यांनी सांगितले की, मंदिरात प्रवेश केल्यानंतर पंतप्रधान मोदी हे सर्वप्रथम सर्व विश्वाच्या शांतीसाठी आणि कल्याणासाठी तसेच भारत विश्वगुरु व्हावा, यासाठी देश का सपना, विश्वगुरू बने भारत आपना : 'भारत विश्वगुरू व्हावा' हा संकल्प करणार आहेत. तसेच चांद्रयान मोहिमेच्या यशस्वीतेसाठी आणि मोरयाच्या संवर्धनासाठी प्रार्थना करणार आहेत. त्यानंतर गणरायाची पंजामृताने पूजा, जलाभिषेक, धुप, दीप नैवेद्य दाखवून दोन्ही मूर्तींचा अभिषेक करतील. अभिषेकासाठी जे जल असणार आहे, त्यात गंगाजल मिसळलेले असेल. त्यानंतर श्री ची आरती होईल. हा कार्यक्रम साधारण १५ ते २० मिनिटे चालेल. त्यानंतर ट्रस्टींशी संवाद साधतील. ट्रस्टकडून पंतप्रधानांचा सन्मान केला जाईल.
तिसरी पिढी करतेय पौरोहित्य
मिलिंद राहुरकर यांची तिसरी पिढी प्रौरोहित्य करीत आहेत. मिलिंद राहुरकर हे गेली ६० वर्षे पुजा अर्चा करतात. त्यांचे वडिल ३० वर्षे आणि आजोबा १० ते १५ वर्षे पौरोहित्य करीत होते. दर महिन्यांची संकष्टी चतुर्थी, महत्वाचे उत्सव तसेच गणेशोत्सवातील दहा दिवस दगडूशेठ हलवाई गणपतीची पुजा अर्चा राहुरकर करत असतात. त्याचबरोबर सारसबागेसमोरील महालक्ष्मी मंदिरातील नवरात्रामधील पुजा अर्चाही त्यांच्याकडे असते.