पुणे : स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आदर्श असणारे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील आणि नाशिक महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे हे दोघेही पुण्यात एका कार्यक्रमात एकत्र येणार आहेत. या कार्यक्रमाबद्दल स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आहे. या दोघांशिवाय तेलंगणातील राचकोंडाचे पोलीस आयुक्त महेश भागवत , पुणे प्रादेशिक विकास महामंडळाचे महानगर आयुक्त किरण गित्ते हेदेखील उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे नियोजन सोयीचे व्हावे, यासाठी विद्यार्थ्यांनी नावनोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी www.dharmpatre.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.
सुमेध पब्लिकेशन प्रकाशित व सुजित धर्मपात्रे लिखित 'आधुनिक भारताचा इतिहास' या पुस्तकाचे प्रकाशन व स्पर्धा परीक्षार्थींसाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. शनिवार, दि. २३ जून २०१८ रोजी सायंकाळी ५ वाजता, गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट, पुणे येथे हा कार्यक्रम होणार आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार (आयपीएस) असणार आहेत, अशी माहिती पुस्तकाचे लेखक सुजित धर्मपात्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सुजित धर्मपात्रे म्हणाले,२०१६ च्या यूपीएससी परीक्षेत भारतातून तिसरा आलेल्या गोपाल कृष्ण रोनांकी यांना हिंदी व इंग्लिश या भाषा फारशा अवगत नसतानाही त्यांनी यश मिळविले. त्यांनी तेलुगु भाषेतून या परीक्षांचा अभ्यास केला. याचा अर्थ तेलगू भाषेमध्ये स्पर्धा परीक्षांकरिता दर्जेदार साहित्याची निर्मिती झाली आहे. महाराष्ट्रातही मराठी भाषिक विद्यार्थ्यांना दर्जेदार असे मराठी साहित्य उपलब्ध करून दिले, तर महाराष्ट्रीय युवकही या स्पर्धेत पहिल्या क्रमांकावर येऊ शकतील.