लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पहिल्या व्हिजन करंडक तीन दिवसीय क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत दुसऱ्या दिवशी व्हिजन क्रिकेट अकादमी संघाने दिवसाखेर आठ गडी बाद ४१९ धावा करून पहिल्या डावात १३२ धावांची आघाडी घेतली.
व्हिजन स्पोर्ट्स सेंटर, सिंहगड रोड येथील मैदानावर खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेत पहिल्या डावात सिद्धीविनायक क्रिकेट क्लब संघ प्रथम फलंदाजी करताना ७८.३ षटकांत २८७ धावांवर आटोपला. प्रत्त्युतरात ‘व्हिजन क्रिकेट अकादमी’ने दुसऱ्या दिवशी ८३ षटकांत ८ बाद ४१९ धावा केल्या.
यात हृषीकेश मोटकर याने अफलातून फलंदाजी करत १७६ चेंडूत ३८ चौकार व एका षटकारासह १८९ धावांची खेळी केली. हृषीकेश मोटकरने मयूर खरात (२४ धावा)च्या साथीत पहिल्या गड्यासाठी ८२ चेंडूत ८७ धावांची भागीदारी केली. पण मयूर खरात सारीश देसाईच्या गोलंदाजीवर पायचीत बाद झाला. त्यानंतर हृषीकेश याने शौनक त्रिपाठी (७३ धावा)च्या साथीत २१६ चेंडूत १९२ धावांची भागीदारी करून संघाची बाजू भक्कम करत आघाडी मिळवून दिली. हृषीकेश रंगतदार खेळ करत असताना कुणाल तांजनेच्या गोलंदाजीवर जोरदार फटका मारताना संदीप शिंदेने त्याचा झेल पकडून बाद केले.
त्यानंतर फलंदाजीस आलेल्या प्रीतेश माधवन व कुलदीप यांनी सहाव्या गड्यासाठी ५२ चेंडूत ३८ धावांची भागीदारी करून संघाला १३२ धावांची आघाडी मिळवून दिली. या दोन्ही संघातील अजून एक दिवसाचा खेळ बाकी आहे. श्री सिद्धिविनायक क्रिकेट क्लबकडून देसाई आणि तांजने यांनी प्रत्येकी चार गडी बाद केले.