पुणे : काळाच्या पुढे जाऊन शिक्षणाचा विचार करणारे, नवीन संकल्पना आणणारे, उत्तम प्रशासक आणि जमिनीवर पाय ठेवून शिक्षणात मोठ्या प्रमाणात गुणवत्तापूर्ण बदल घडवणारे व्यक्तिमत्त्व आपल्यातून गेले, अशा भावना ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. अरुण निगवेकर यांच्याविषयी शिक्षण क्षेत्रातील विविध नामवंत व्यक्तींनी सोमवारी व्यक्त केल्या.
विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू व ज्येष्ठ शिकणतज्ज्ञ डॉ. अरुण निगवेकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे ऑनलाईन श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. या श्रद्धांजली सभेस सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. नितीन करमळकर, डॉ. एन.एस.उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. संजय चाकणे, माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर तसेच डॉ. दिलीप जोग, सेंटर फॉर मॉडेलिंग अँड सिम्युलेशनचे प्रा.डी. जी.कान्हेरे , स्कूल ऑफ एनर्जी स्टेडिजचे अध्यक्ष प्रा. एस. व्ही. घैसास, आयुकाचे अजित केंभवी, डॉ. चंद्रशेखर चितळे, डॉ. सुरेश गोसावी, डॉ. गणेश हेगडे उपस्थित होते.
श्रद्धांजली सभेत उपस्थितांनी डॉ. अरुण निगवेकर यांच्यासोबत काम करतानाचे अनुभव व त्यांच्या आठवणी सांगितल्या. भौतिकशास्त्र विभागातील त्यांनी राबवलेली कार्यपध्दती, सर्व विद्यापीठात ई-जर्नल सुरू करण्याचे त्यांचे महत्त्वाचे कार्य, राष्ट्रीय मूल्यांकन परिषद व आयसर सुरू करण्यासाठीचे त्यांचे योगदान आदी गोष्टींबाबतचे अनुभव उपस्थितांनी सांगितले.
---------
गुणवत्तापूर्ण शिक्षणात डॉ. अरुण निगवेकर यांचे काम खूप मोठे होते. विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागातील तज्ज्ञांनी देशाला खूप मोठे नेतृत्व दिले. डॉ. निगवेकर सरांनी दाखवलेल्या वाटेवरून विद्यापीठाला पुढे नेण्याचा प्रयत्न करणे हीच त्यांच्यासाठी खरी श्रद्धांजली ठरेल.
- डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ