धनकवडी : शहरात बुधवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे दक्षिण उपनगरांमधील अनेक भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अतिवृष्टीमुळे फटका बसलेल्या दक्षिण उपनगरांमधील कात्रज , लेकटाऊन, बालाजीनगर , टेझरपार्क , टांगेवाला काॅलनी, चैत्रगन सोसायटी या भागाला खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी भेट दिली.
अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर असून यासाठी ठिकठिकाणी आरोग्य शिबीराचे आयोजन करण्याच्या सुचना भोसले यांनी कार्यकर्त्यांना दिल्या तसेच पुरस्थितीमुळे होणाऱ्या संसर्गजन्य आजार व औषधांची माहिती नागरिकांना दिली.
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पुरस्थिती नंतर दुर्दैवाने पुण्याला नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागत आहे. तेथील अनुभव लक्षात घेऊन भविष्यात अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी काही ओढ्यांचे पुनर्वसन करणे गरजेचे असल्याचे मत भोसले यांनी व्यक्त केले, आणि त्यासाठी प्रयत्न चालू केले असल्याचे ही सांगितले.
यावेळी त्यांनी पुणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांच्याशी फोन वरुन चर्चा केली. यावेळी अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाचे संचालक छावाप्रमुख धनंजय जाधव , राहुल पापळ , गौरव दिघे, अतुल चव्हाण ,मालोजी जगदाळे ,गौतम जाधव , संकेत सोनवणी उपस्थित होते.