पुणे : प्रजासत्ताक दिनी महापालिका व पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनी यांच्याकडून पुणेकर नागरिकांनी अनोखी भेट दिली जात आहे. शहरातील तब्बल १५० ठिकाणी शुक्रवारपासून मोफत वाय-फाय सुविधा उद्याने, पोलीस ठाणी, रुग्णालये, सरकारी कार्यालये, संग्रहालये अशा ठिकाणांचा यात समावेश आहे.महापौर मुक्ता टिळक यांच्या उपस्थितीत महापालिका आयुक्त कुणाल कुमार व कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप यांनी ही माहिती दिली. प्रायोगिक स्तरावर हा उपक्रम असून त्यातील त्रुटी लक्षात घेऊन नंतर तो कायमस्वरूपी व आणखी अनेक ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे. ही सर्व ठिकाणी तसेच कशा पद्धतीने वाय-फाय जोडणी आपल्या मोबाईल किंवा लॅपटॉपमध्ये करून घ्यायची याबाबतची सर्व माहिती पुणे स्मार्ट सिटी फेसबुक पेजवरील इव्हेंट या ठिकाणी देण्यात आलेली आहे, अशी माहिती देण्यात आलीवेळेचे बंधन नाही-सुरुवातीला या सेवेला वेळेचे बंधन नाही. या सर्व ठिकाणांहून कितीही वेळ इंटरनेटची सुविधा पुरवली जाईल. स्मार्टफोन तसेच लॅपटॉपवरही ही सुविधा वापरता येईल. नेटवर्कच्या क्षेत्रात असणा-यांना मोबाईलवर पाठवला जाणारा वन टाईम पासवर्ड (ओटीपी) टाकून सोप्या लॉग इन प्रक्रियेने ही सेवा सुरू करता येईल. तसेच क्युअर कोड स्कॅन वापरूनही सेवा मिळवता येईल. या सर्व ठिकाणांच्या प्राथमिक चाचण्या घेण्यात आल्या आहेत. त्या यशस्वी झाल्यानंतरच त्या ठिकाणांचा यादीत समावेश करण्यात आला आहे.जग बदलते आहे, जगातील देश, शहरे बदलत आहेत. त्यात पुणे मागे राहू नये. आतापर्यंत प्रत्येक क्षेत्रात पुणे अत्युत्तम राहिले आहे. त्यामुळे आयटीच्या नव्या जगातही पुण्याचा झेंडा कायम उंच फडकत राहिला आहे. त्याच अनुषंगाने ही सेवा प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला सुरू करत आहोत, असे या वेळी महापौर मुक्ता टिळक, आयुक्त कुणाल कुमार व मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप यांनी सांगितले.
प्रजासत्ताकदिनी भेट ! पुण्यात 150 ठिकाणी मोफत वाय-फाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2018 6:17 AM