पुणे : मान्सून सुरु झाला की विविध ठिकाणी फिरायला जाण्याचे प्लॅन केले जातात. वर्षाविहाराचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक नवनवीन ठिकाणांचा शाेध घेत असतात. मान्सूनमध्ये डाेंगर हिरवी चादर पांघरत असल्याने ते दृष्य प्रत्येकाच्या ह्रद्याचा ठाव घेत असते. तसेच सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून काेसळणारे धबधबे प्रत्येकाच्याच आकर्षणाचे केंद्रबिंदू असतात. महाराष्ट्राचे वैभव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले. या किल्ल्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या वैभवाची, महाराजांच्या पराक्रमाची आपल्याला माहिती मिळते. त्याचबराेबर मान्सून मध्ये या किल्ल्यांवरुन दिसणारं दृश्य नयनरम्य असतं. त्यामुळे या मान्सूनमध्ये तुम्ही पुण्याजवळच्या या पाच किल्ल्यांना नक्कीच भेट देऊ शकता.
1) सिंहगडगड आला पण सिंह गेला हे शिवाजी महाराजांचे उद्गार आपल्या सर्वांनाच माहित आहेत. मुघलांच्या ताब्यातून सिंहगड मिळवताना तानाजी मालुसरे यांना वीरमरण आले. शिवाजी महाराजांचा सिंहासारखा लढवय्या मावळा या लढाईत मारला गेल्याने त्याच्या पराक्रमाची ओळख म्हणून पूर्वीच्या काेंढाणा किल्ल्याचे सिंहगड असे नामकरण करण्यात आले. पुण्यापासून अवघ्या 25 ते 30 किलाेमीटर अंतरावर सिंहगड किल्ला आहे. पावसाळ्यात या किल्ल्यावरुन नयनरम्य दृश्य पाहायला मिळते. सिंहगडावरुन संपूर्ण पुणे शहर आपल्या दृष्टीस पडते. सिंहगडाच्या दरवाज्यापर्यंत तुम्ही गाडीवर देखील जाऊ शकता. किंवा ट्रेकिंगचा ऑप्शन आहेच. सिंहगडावर गेल्यावर तिकडची भजी आणि पिठलं खायला विसरु नका.
2) राजमाची किल्लापुण्यापासून 50 ते 60 किलाेमीटर अंतरावर हा किल्ला आहे. लाेणावळा आणि खंडाळ्याच्या मध्ये असणारा राजमाची किल्ला नेहमीच पर्यटकांच्या आकर्षणाचा विषय राहिला आहे. पावसाळ्यात गडावरुन दिसणारा निसर्ग स्वर्गाची अनुभूती देऊन जाताे. गडावरील लेण्या आणि मंदिर तुम्हाला इतिहासात घेऊन जातात. ट्रेकर्सचा हा आवडता किल्ला आहे. अनेकजण किल्ल्यावर कॅपींग सुद्धा करतात. त्यामुळे पावसाळ्यात कुठे बाहेर जायचा विचार करत असाल तर राजमाची किल्ला हा एक उत्तम पर्याय आहे.
3) शिवनेरी छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्याचे शिवप्रेमींच्या मनात एक वेगळेच स्थान आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात हा किल्ला आहे. किल्ल्यावर आपल्याला शिवाजी महाराजांचा पुतळा पाहायला मिळताे. गाडीने आपण किल्ल्यावर जाऊ शकताे. पावसाळ्यात गडावरुन दिसणारं दृश्य खूप सुंदर असते. पुण्यापासून 70 ते 75 किलाेमीटरवर हा किल्ला आहे. त्यामुळे तुम्ही टु व्हिलरवर सुद्धा जाऊ शकता.
4) रायगड शिवाजी महाराजांनी 1674 मध्ये रायगड बांधला. समुद्र सपाटीपासून 820 मीटर इतक्या उंचीवर रायगड आहे. स्वराज्याची राजधानी म्हणून रायगड ओळखला जाताे. रायगडावरुन स्वराज्यावर नजर ठेवली जात असे. गडावर महाराजांची समाधी पाहायला मिळते. त्याचबराेबर गडावर जगदीश्वराचे मंदीर व वाघ्या कुत्र्याची समाधी सुद्धा आहे. स्वराज्य द्राेह करणाऱ्याला याच गडावरील टकमक टाेकावरुन दरीत फेकण्यात येई. हिरकणीची कथा आपण सगळेच जाणताे. जाे बुरुज उतरुन हिरकणी गेली हाेती ताे बुरुज सुद्धा आपल्याला या गडावर पाहायला मिळताे. रायगडावर माेठी बाजारपेठ हाेती. त्या बाजारपेठेचे अवशेष अजूनही गडावर आहेत. राेपवेच्या माध्यमातून गडावर जाता येते. त्याचबराेबर गडावर जाण्यासाठी पायऱ्या देखील आहेत. राजगड ते रायगड असा ट्रेक अनेक ट्रेकर्स करतात. महाराजांचा राज्याभिषेक याच गडावर झाला हाेता. पुण्यापासून 85 ते 90 किलाेमीटरवर हा किल्ला आहे.
5) राजगड गरुडाने पंख विस्तारल्यावर जसा आकार दिसताे, तशा आकाराचा हा किल्ला आहे. राजगड हा अभेद्य किल्ला म्हणून ओळखला जाताे. किल्ल्याच्या तिन्ही माच्या पाहण्यासारख्या आहेत. गडाचा हत्ती बुरुज देखील प्रेक्षणीय आहे. किल्ल्यावरुन सुर्याेदय सुंदर दिसताे. किल्ला चढून जावा लागताे. पावसाळ्यात किल्लायावरचे दृश्य पाहण्यासारखे असते. पुण्यापासून 60 ते 65 किलाेमीटर अंतरावर हा किल्ला आहे.