पुणे : मोगूबाई कुर्डीकर, हिराबाई बडोदेकर, माणिक वर्मा, ज्योत्स्ना भोळे, पं. वसंतराव देशपांडे, पं. जितेंद्र अभिषेकी, सुधीर फडके ही नुसती नावं नाहीत, तर सांगीतिक विश्वातील अमूल्य अशी रत्ने आहेत. जुन्या पिढीचे स्मरणरंजन होण्याबरोबरच नव्या पिढीला या व्यक्तिमत्त्वांना समोर बसून ऐकण्याची संधी मिळणार आहे.
एकेकाळी दूरदर्शनवर सादर झालेल्या साहित्यिक-सांगीतिक कार्यक्रमांचा स्वसंग्रही असलेला ‘बासन-एक चित्रकथी’ हा चित्रफिती आणि श्राव्यफितींचा दुर्मिळ दस्तावेज मुंबई दूरदर्शनचे माजी निर्माते अरुण काकतकर यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीकडे सुपूर्त केला आहे. टप्प्याटप्प्याने या अमूल्य ठेव्याचे दर्शन रसिकांना घडणार असून, येत्या १ सप्टेंबर रोजी या सुंदरमालेतील ‘शाकुंतल ते मानापमान’ या नाट्यसंगीताचा मूलस्रोत सप्रयोग फर्ग्युसन महाविद्यालयाच्या अॅम्फी थिएटरमध्ये उलगडला जाणार आहे. तीस ते चाळीस वर्षांपूर्वी विविध क्षेत्रांत महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या मान्यवरांना मुंबई दूरदर्शनवर कार्यक्रमांद्वारे सादर करताना अरुण काकतकर यांनी काहींचे खासगी रेकॉर्डिंग करून ते जतन करण्याचे काम केले आहे.
हिराबाई बडोदेकर, मोगूबाई कुर्डीकर, माणिक वर्मा यांनी गप्पा आणि आठवणींतून खुलवलेली मैफल, बाकीबाब, कुसुमाग्रज, शांता शेळके, सुरेश भट या कवींची मनोगत तसेच मंगेशकर कुटुंबीयांची संवाद आणि गाण्यांची मैफल, राम शेवाळकर, डॉ. जयंत नारळीकर यांची व्याख्याने, अशा नानाविध दुर्मिळ गोष्टींचा या संग्रहात समावेश आहे.
‘लोकमत’शी बोलताना अरुण काकतकर म्हणाले, १९७८ ते १९८७ या काळातील साहित्यिक-सांगीतिक कार्यक्रमांचा हा अमूल्य दस्तावेज आहे. त्या वेळी व्हीएचएस कॅसेटच्या माध्यमातून कार्यक्रमांचे रेकॉर्डिंग केले होते. या ठेव्याचे स्वखर्चाने डिजिटलायझेशन करून हार्डडिस्कवर तो जतन करून ठेवला आहे. राजेश कनगे या माझ्या सहकाऱ्याच्या मदतीने एडिटिंगचे बरेचसे काम करण्यात आले आहे.संग्रहालयाकडून प्रतिसाद मिळालाच नाहीया दुर्मिळ संग्रहाचे कायमस्वरूपी जतन व्हावे असे वाटत होते म्हणून हा दुर्मिळ ठेवा राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला द्यायचा विचार होता; पण दर महिन्याला दोन तास हा ठेवा रसिकांसाठी खुला करून द्यायचा, अशी एक अट ठेवली होती. मात्र संग्रहालयाकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे डेक्कन एज्युकेशन सोसायटीला हा ठेवा देण्याचे ठरविले. कारण फर्ग्युसन महाविद्यालयाच्या अॅम्फी थिएटरला एक परंपरा आहे.
सामान्यांना या ठेव्याचे दर्शन घडावे, या उद्देशाने ‘शांकुतल ते मानापमान’ हा पहिला कार्यक्रम सादर होणार आहे. १९८० साली एफटीआयआयमध्ये हा कार्यक्रम चित्रित केला आहे. नारदीय कीर्तन परंपरा नाट्यसंगीताचा मूळ स्रोत आहे. नाटककार सुरेश खरे, पं. वसंतराव देशपांडे यांच्याशी संवाद साधत हा पट मांडला आहे. पं. वसंतराव आणि आशाताई खाडीलकर यांना ऐकता येणार आहे.या ठेव्याच्या शीर्षकाविषयी सांगताना ते म्हणाले, ‘बासन’ म्हणजे जुने कपडे आणि ‘चित्रकथी’ ही एक पारंपरिक करमणुकीची कला आहे. डेंगुळी गावात चामड्याच्या बाहुल्या बोटावर नाचवतात आणि मागे दिवा लावलेला असतो. समोर प्रेक्षक बसलेले असतात. किशोर गरड या फर्ग्युसनच्या विद्यार्थ्याला हे नाव सुचले. पुणे हे सांस्कृतिक शहर असल्याने शहराच्या चौकाचौकांत या ठेव्याच्या चित्रफिती लावल्या जाव्यात अशी मनापासून इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले.