पुणे : सातत्याने बैठे काम, बदललेली जीवशैैली, योग्य व्यायामाचा आणि आहाराचा अभाव, मुलांमधील मैैदानी खेळांचे कमी झालेले प्रमाण यामुळे मानवी शरीर अनेक आजारांना आमंत्रण देत आहे. अनेकांमध्ये जीवनसत्त्वांची कमतरता आढळून येत आहे. एका खासगी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार ८० टक्के पुणेकरांमध्ये ‘ड’ जीवनसत्त्वाचा अभाव आढळून आला आहे.‘ड’ जीवनसत्त्वाच्या कमतरतेत वाढ होण्याचा प्रकार भारतासह जगभरात दिसून आलेला आहे. पूर्वीच्या तुलनेत शारीरिक कामापेक्षा बैैठ्या कामाचे प्रमाण वाढले आहे. आजकाल मुले मैदानी खेळांपेक्षा डिजिटल गेम्सकडील कल वाढला आहे.भेसळयुक्त आणि प्रक्रिया केलेले अन्नाचे प्रमाण वाढल्यानेही ‘ड’ जीवनसत्त्वाचा अभाव जाणवूलागला आहे. सर्वेक्षणानुसार, १० पैैकी ८ पुणेकरांमध्ये ‘ड’ जीवनसत्त्वाची उणीव असल्याचे सिद्ध झाले आहे. ‘सनशाइन व्हिटॅमिन’ म्हणून सर्वश्रुत असलेले ‘ड’ जीवनसत्त्व सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यावर त्वचेमध्ये तयार होते. जीवनसत्त्वाच्या अभावामुळे खनिजांचे प्रमाण वाढून त्यामुळे हाडे ठिसूळ होऊ शकतात.जीवनसत्त्वाची कमतरता आणि अभाव असलेल्या रुग्णांमध्ये भारतात वाढ होत आहे. पुरुष, स्त्रिया आणि मुले हे सर्व तेवढेच प्रभावित आहेत. आपल्यामध्ये ‘ड’ जीवनसत्त्वाचा अभाव असल्याबाबत सामान्यांमध्ये जनजागृती झालेली दिसून येत नाही. भारतीयांमध्ये तब्येतीच्या किरकोळ तक्रारी करण्याची मानसिकता रुजली असल्याने जीवनसत्त्वांच्या अभावाकडे फारसे लक्ष दिले जात नाही.२०१२ ते २०१६या पाच वर्षांच्या काळात० ते ८० वयोगटांतील १,२९,९१९ नमुन्यांची तपासणी गोळवलकर मेट्रोपोलीसच्या आधुनिक केंद्रात करण्यात आली.थकवा व वेदना अशी लक्षणे दुर्लक्षित केली जातात. नागरिकांनी अन्नात पूरकता आणण्याची गरज आहे, असे मत डॉक्टरांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.नागरिकांनी दैनंदिन आहारात ‘ड’ जीवनसत्त्व असलेल्या अन्नपदार्थांचा समावेश करण्याची गरज आहे. मासे, अंड्यातील पिवळे बलक यामध्ये ‘ड’ जीवनसत्त्वाचे प्रमाण मुबलक आहे. दूध, सोया मिल्क, आॅरेंज ज्यूस, डाळी आणि मशरुम हे शाकाहारी लोकांसाठी पर्याय आहेत. ‘ड’ जीवनसत्त्व तयार होण्यासाठी आवश्यक सूर्यप्रकाश आणि योग्य आहार घेणे आपल्या जीवनशैलीमुळे शक्य होत नाही. ‘ड’ जीवनसत्त्वाच्या अभावासाठी चाचणी करणे आणि वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.- डॉ. सुशील शहा
पुणेकरांमध्ये जीवनसत्त्व कमी, सर्वेक्षणातून निष्कर्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 4:20 AM