लोकमत न्यूज नेटवर्कबारामती : ‘विठू माऊली तू माऊली जगाची’ या अभंगाप्रमाणे विठ्ठल आईच्या मायेने सर्व भक्तांची काळजी घेतो. भक्तांना मदतीसाठी कोणत्याही रूपाने धावून जातो. संतश्रेष्ठ तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यातील एका वारकरी महिलेलादेखील डॉक्टरांच्या रूपाने विठ्ठल भेटला.रुक्मिणी भगवंत अभंग असे या ज्येष्ठ वारकरी महिलेचे नाव आहे. रांंजणगाव गणपती (ता. शिरूर) येथे शनिवारी (दि. २४) पालखी सोहळा उंडवडी सुपे येथे विसावला. यादरम्यान अभंग यांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने अपघाताला सामोरे जावे लागले. यामध्ये त्यांचा पाय जायबंदी झाला. त्यांच्या दिंडी प्रमुखाने १०८ क्रमांकावर संपर्क साधून रुग्णवाहिकेतून रुक्मिणी यांना बारामती येथील सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात दाखल केले. जायबंदी झालेल्या पायाची येथील वैद्यकीय अधीक्षिका डॉ. मीरा चिंचोलीकर यांनी तपासणी केली. त्यानंतर त्यांनी अस्थितज्ज्ञ डॉ. गोकुळ काळे यांच्याशी संपर्क साधला. तपासणीनंतर रुक्मिणी यांच्या उजव्या पायाचा पंजा आणि गुडघ्याच्या मधील हाड मोडल्याचे तपासणीत निष्पन्न झाले. त्यानंतर सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी डॉ. काळे यांनी एक्स-रे यंत्रणेसह शस्त्रक्रियेसाठी आवश्यक सहित्य त्यांच्या रुग्णालयातून सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात हलविले. त्यांच्या पायात स्टीलचा रॉड बसविण्यात आला आहे. या वेळी भूलतज्ज्ञ डॉ. सुजित अडसूळ, डॉ. चिंचोलीकर यांनी शस्त्रक्रियेदरम्यान सहकार्य केले.डॉ. काळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले, की रुक्मिणी अभंग यांच्या उजव्या पायाच्या नडगीचे हाड मोडले आहे. त्यांच्यावर ‘इंटर लॉकिंग टीबिया मेलिंग’ शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यानुसार त्यांच्या पायात रॉड बसविण्यात आला आहे. एका महिन्यात त्या पूर्ववत चालू शकतील.डॉक्टरांनी वाढविले मनोबलरुक्मिणी अभंग यांना शुक्रवारी (दि. २३) सायंकाळी सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात दाखल करण्यात आले. या वेळी त्यांच्यासोबत जवळचे कोणीही नव्हते. पाय दुखत असल्याने त्या अक्षरश: रडत होत्या. त्यामुळे घरी जाण्याचा त्या डॉक्टरांकडे हट्ट करीत होत्या. ल्ल पायाचे हाड मोडल्याने त्यांना शस्त्रक्रिया केल्याशिवाय जाऊ देणे शक्य नव्हते. त्यामुळे डॉक्टर मीरा चिंचोलीकर, डॉ. रणजित मोहिते यांनी त्यांना धीर दिला. याच ठिकाणी ‘आपण तुमच्यावर चांगले उपचार करू. तुम्ही लवकर बऱ्या व्हाल,’ अशा शब्दांत त्यांना धीर दिला. त्यामुळे रुक्मिणी यांना धीर मिळाला. डॉक्टरांनीच नातेवाइकांची भूमिका बजावली.
डॉक्टरांच्या रूपात भेटला विठ्ठल
By admin | Published: June 25, 2017 4:39 AM