या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार तरुण प्रशांत चिखले, निवृत्ती भालेराव, किरण चिखले, राहुल चिखले व त्यांचे काही मित्र कामानिमित्त कळंब येथे मोटारसायकलीवर गेले होते. नांदूर फाटा ते विठ्ठलवाडी या रस्त्याने घरी येत असताना विठ्ठलवाडीच्या परिसरात गुलाब चिखले यांच्या शेताजवळ एका प्राण्याचे डोळे चमकत असल्याचे त्यांना दिसले. थोडेसे जवळ जाऊन निरखून पाहिल्यावर शेतात पंचवीस ते तीस फूट अंतरावर बिबट्या उभा असल्याचे दिसले. त्यामुळे तरुण घाबरले आणि आरडाओरड केली. त्यांच्या आरडाओरड ऐकून बिबट्याने धूम ठोकली. काही तरुणांनी मोबाइलमध्ये बिबट्याचा फोटोही घेतला.
--
चौकट
पाळीव प्राण्यांचा जीव धोक्यात
चास, नांदूर, महाळुंगे पडवळ, विठ्ठलवाडी या परिसरात बिबट्याचा वाढता प्रादुर्भाव पाहता या परिसरात बिबट्याने पाळीव कुत्री, शेळ्या, मेंढ्या व वासरांचा मोठ्या प्रमाणात आतापर्यंत फडशा पाडला आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना रात्री-अपरात्री विहिरीवरील विद्युत मोटारी चालू करण्यासाठी एकट्याने घराच्या बाहेर पडावे लागत आहे. या परिसरातील एखाद्या नागरिकाचा बिबट्याने जीव घेतल्यावर वन विभाग जागे होणार का, असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत.