पुणे : पूर्ववैमनस्यातून बदला घेण्यासाठी शिक्षा झालेल्या गुन्हेगाराला सुपारी देणाऱ्या पुणे कॅन्टोन्मेंटचा माजी नगरसेवक विवेक यादव याचा गेल्या ५ दिवसांपासून कोंढवा पोलीस शोध घेऊन असून अद्याप तो पोलिसांना सापडलेला नाही. राजन राजमणी याला पकडल्याचे समजल्यावर तो फरार झाला आहे.
कॅन्टोन्मेंटचा माजी नगरसेवक विवेक यादव याची पार्श्वभूमीही गुन्हेगारी स्वरुपाची असून, त्याला पोलिसांनी तडीपारही केले होते. त्यावर त्याने उच्च न्यायालयातून तडीपारीला स्टे मिळविला. भाजपने तडीपारीचा शिक्का असताना त्याला तिकीट दिले व तो २०१५ मध्ये नगरसेवक म्हणून निवडून आला होता.
गवळी आणि यादव यांच्यामध्ये २०१४ पासून विविध कारणांवरून भांडणे झाली आहेत. कँटोन्मेंट बोर्डाकडून बेकायदेशीर पार्किंग शुल्क वसुलीची प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी आपल्यावर गोळीबार झाल्याचा दावा यादव याने केला होता. विवेक यादव याच्याविरुद्ध दहशत पसरवणे, बेकायदेशीररीत्या शस्त्र बाळगणे, खंडणी, खुनाचा प्रयत्न अशा विविध गुन्ह्यांत न्यायालयात खटले सुरु होते. तसेच तत्कालीन परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त डॉ. सुधाकर पठारे यांनी यादव याला ४ ऑक्टोबर २०१४ रोजी २ वर्षांसाठी पुणे शहर व जिल्ह्यातून तडीपार केले होते. त्याविरुद्ध त्याने उच्च न्यायालयात धाव घेऊन त्यावर स्थगिती मिळविली होती. त्यामुळे तो पुणे जिल्ह्यात प्रवेश करु शकला होता. २०१५ मध्ये झालेल्या पुणे कँटोंमेंटच्या बोर्डाच्या निवडणुकीत तो निवडून आला होता.
उत्सव संवर्धन मंडळाचा अध्यक्ष व भाजपचा नगरसेवक असताना २०१६ मध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत विवेक यादव याच्यावर बबलू गवळी याने गोळीबार केला होता. या गोळीबारातून यादव थोडक्यात बचावला होता. याप्रकरणी लष्कर पोलिसांनी गवळी टोळीच्या १३ जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता. यामुळे गवळीविरुद्ध यादव याला कायम राग होता. त्याचा काटा काढण्यासाठी त्याने सुपारी दिली व शस्त्रेही पुरिवली होती. सुदैवाने त्याची खबर पोलिसांना लागली व गवळीचा गेम होण्याऐवजी त्यांचाच गेम झाला.