Ajit Pawar: बिटकॉइन घोटाळ्यातील ऑडिओ क्लिपमध्ये आवाज सुप्रिया सुळे आणि पटोलेंचाच; अजित पवारांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2024 05:16 PM2024-11-20T17:16:17+5:302024-11-20T17:16:55+5:30
मी नाना पटोले आणि सुप्रिया सुळे यांचा आवाज चांगला ओळखतो
बारामती: बिटकॉइन घोटाळ्यातील ऑडिओ क्लिप प्रकरणाची निपक्ष चौकशी होणे गरजेचे आहे. त्याबद्दल एकायला मिळते, त्यांनी काय मांडले. मी नाना पटोले आणि सुप्रिया सुळे यांचा आवाज चांगला ओळखतो. त्यामुळे ते आवाज त्या दोघांचेच आहेत. चौकशीनंतरच यामागील गुपित काय आहे ते बाहेर येईल, अशी प्रतिक्रीया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावरील बिटकाॅइन बाबत भाजपकडुन झालेल्या आरोपाबाबत व्यक्त केली आहे. काटेवाडी येथे बुधवारी (ता. २०) सकाळी सातच्या दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेसाठी मतदान केले. यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा दावा केला आहे.
यंदाची निवडणुक अवघड वाटते का? या पत्रकारांच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, लोकसभेप्रमाणे विधानसभेला देखील आमच्या घरातीलच उमेदवारांमध्ये लढत आहे. कोणतीही निवडणुक आम्ही गांभीर्याने घेतो. हि निवडणुक विकासावर लढायची होती. सकारात्मक दृष्टीने तसेच आम्हाला कोणावर टीका करायची नव्हती. माझे समर्थक, प्रचार यंत्रणांनी तीच भुमिका घेतल्याचे पवार म्हणाले. बारामती आणि महाराष्ट्राच्या व्हीजनवर मी मते मागितली. याबाबत बारामतीकरांचा अधिकार आहे, मात्र मला पूर्ण विश्वास आहे की बारामतीकर यंदा मला चांगल्या मतांनी निवडून देतील. बारामती मध्ये भावनिक राजकारण होते काय या प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले मी कधी भावनिक राजकारण केले? तुम्ही माझ्या सांगता सभेतील भाषण पाहिले असेल यावेळी मी फक्त मी पाच वर्षांमध्ये काय केले. बारामतीत पुढील पाच वर्षात काय करणार आहे याचा लेखाजोखा मांडला. मला विश्वास आहे की बारामतीकर यंदा देखील मला मोठ्या मताधिक्याने निवडून देतील,असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.