लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ‘ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला’ अशा जाज्वल्य शब्दांमधून स्वातंत्र्यवीर सावरकरांची मातृभूमीविषयीची उत्कटता प्रतीत होणाऱ्या अजरामर गीतास नुकतीच (१० डिसेंबर) १११ वर्ष पूर्ण झाली. यानिमित्ताबरोबरच नऊ महिन्यानंतर नाट्यगृहांचा पडदा उघडला असताना पुन्हा प्रेक्षकांची पावले नाट्यगृहाकडे वळावीत या दुहेरी हेतूकरिता पुण्यात ‘होय मी सावरकर बोलतोय’ हा नाटकाचा स्वेच्छा मूल्य प्रयोग होणार आहे. हे नाटक प्रेक्षकांसमोर विनामूल्य सादर होणार आहे. रसिकांनी त्यांना शक्य होतील आणि योग्य वाटतील तितकेच पैसे प्रयोगाच्या नंतर द्यावेत, अशी ही अभिनव संकल्पना आहे. या नाटकाच्या स्वेच्छा मूल्य प्रयोगांची सुरुवात २० डिसेंबरपासून पुण्यनगरीत होणार आहे. प्रेक्षकांसाठी केलेला हा पहिलाच उपक्रम ठरणार आहे.
काही नाटकांचे या पूर्वीही असे प्रयोग आपल्याकडे झाले आहेत; मात्र लॉकडाऊन नंतर प्रेक्षकांनी नाटकाला यावं यासाठी हे प्रयोग स्वेच्छा मूल्य करण्याचे धाडस अभिजात प्रॉडक्शन या संस्थेने दाखविले आहे. याविषयी निर्माते व अभिनेते आकाश भडसावळे म्हणाले, मुळातच काही दोन ते चार नामांकित संस्था व त्यांची नाटके वगळता लॉकडाऊन नाटकांना काही फार प्रेक्षक वर्ग होता असे नाही. नाट्य व्यवसायापेक्षा नाट्य कला जिवंत रहावी असं मला वाटतं. म्हणून ‘व्यवसाय’ हा शब्द बाजूला काढून निव्वळ ‘नाटक करायचं’या उद्देशाने आम्हा सगळ्यांचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. यासाठी एक सुरेख योगायोग जुळून आला तो ‘सागरा प्राण तळमळला’ च्या शतकोत्तर एकादश पूर्तीचा! सध्या मुंबई-पुण्यात व नंतर इतरही ठिकाणी असे प्रयोग करण्याचा मानस आहे. नाटक व्यवसाय पूर्ववत होईपर्यंत आम्ही असे प्रयोग करत राहू.
या नाटकात बहार भिडे, विजय पाटील, नरेंद्र कुलकर्णी, कविता नाईक, सुमित चौधरी, प्रसाद संगीत आणि आकाश भडसावळे हे कलाकार काम करीत आहेत. हे नाट्य प्रयोग २० डिसेंबरला दुपारी १२:३० रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड तर सायंकाळी ६ वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड येथे होणार आहेत.