लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : वयाची ५० वर्ष पूर्ण केल्यानंतर स्वेच्छा निवृत्ती घेण्याची योजना एसटी महामंडळाने मान्यताप्राप्त कामगार संघटनेबरोबर चर्चा न करताच राबवण्यास सुरूवात केल्याचा आरोप एसटी कामगार संघटनेने केला आहे. संघटनेच्या मागण्यांवर चर्चा करावी अन्यथा योजना मागे घ्यावी अशी मागणी संघटनेने केली आहे.
एसटी महामंडळ व्यवस्थापनाने जाहीर केलेल्या स्वेच्छा निवृत्ती योजनेत सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यास सेवेत शिल्लक राहिलेल्या प्रत्येक वर्षासाठी ३ महिन्यांचे वेतन मोबदला म्हणून देण्याचे मान्य केले आहे. कामगार संघटनेने मात्र शिल्लक सेवेतील प्रत्येक वर्षासाठी ६ महिन्यांचे वेतन आणि संबंधित कर्मचाऱ्याच्या एका पाल्यास अनुकंपा तत्वावर नोकरी देण्याची मागणी केली होती.
या मागण्यांचा विचार न करता, संघटनेबरोबर चर्चाही न करता प्रशासनाने थेट ३ महिन्यांचे वेतन देणारी योजना जाहीर केली, असे संघटनेचे सरचिटणीस हनुमंत ताटे यांनी सांगितले. एसटी कामगार संघटना ही महामंडळातील एकमेव मान्यताप्राप्त संघटना आहे. कामगारांशी संबधित कोणताही निर्णय घेण्यापुर्वी या संघटनेबरोबर चर्चा करणे महामंडळ प्रशासनास कायद्याने बंधनकारक आहे. त्याचे पालन महामंडळाने केलेले नाही असे ताटे म्हणाले.