पुणे: सीए अभ्याक्रमाच्या अंतिम वर्षाची तयारी करणार्या आणि स्वयंसेविका जागृती अयाचित या युवतीने अथक परिश्रम करून ३०० पेक्षा जास्त प्लाझ्मा दाते गोळा केले आहेत. रुग्णांना प्लाझ्मादान करून जीव वाचवण्याचे मौल्यवान कार्य या युवतीने केले आहे. प्लाझ्मा संकलनाच्या कामाला महत्त्व देऊन तिने सीए ची अंतिम वर्षातील परिक्षा देखील दिली नाही. कुणाचाही फोन चुकायला नको म्हणून तिने या कामासाठी स्वत:ला झोकून दिले होते.
टाळेबंदीच्या सुरुवातीला राबवल्या गेलेल्या रेड झोन स्क्रिनिंग पासून ते कोविड केअर सेंटरमध्ये तिने हिरीरीने सहभाग नोंदवला होता. रक्तपेढ्यांना पुरेसा प्लाझ्मा मिळावा यासाठी तिने समन्वयक म्हणून काम केले. केवळ मूठभर लोकचं प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे आली,यावरून असा अंदाज लावला जाऊ शकतो की,प्लाझ्मा दान करण्यासाठी लोकांना तयार करणे किंवा प्लाझ्मा दान मोहिमेचे आयोजन करणे. हे किती आव्हानात्मक काम होते. जागृतीच्या अथक प्रयत्नांमुळे ३०० हून अधिक लोकांना प्लाझ्मा दान करण्यास मदत झाली.
सुरूवातीच्या काळात बर्याच लोकांमध्ये प्लाझ्मा दान करण्याबाबत संभ्रम होता. पण जागृतीने लोकांचे वॉर्डनिहाय वर्गीकरण करुन, समन्वयकांद्वारे लोकांशी संपर्क साधला. त्या सगळ्यांना प्लाझ्मादानाचे महत्व पटवून देऊन कोविड-१९ च्या असंख्य रूग्णांचे जीव वाचविण्यात मदत केली आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही काम चालू ठेवणार
जागृती अयाचित यावेळी म्हणाल्या की, या सन्मानामुळे मला आणखी काम करण्यासाठी प्रेरणा मिळाली आहे. कोरोना साथीचा उद्रेक होत असताना मी प्लाझ्मा दात्यांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली. त्यावेळी प्लाझ्मा दान करणे ही गरजू कोविड रुग्णांसाठी किती महत्वाचे असल्याची मला जाणीव झाली. आता कोरोनाची दुसरी लाट मोठया प्रमाणात आली असताना माझे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे पूर्वीसारखेच अधिक जोमाने काम पुढे सुरू ठेवणार आहे.
सह्याद्रि हॉस्पिटल्स तर्फे सन्मान
प्लाझ्मादान आणि संकलन मोहिमेसाठी अथक परिश्रम केल्याबद्दल सह्याद्रि हॉस्पिटल्स तर्फे सन्मान करण्यात आला. हा सन्मान सह्याद्री हॉस्पिटल्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ चारुदत्त आपटे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सह्याद्री हॉस्पिटलच्या रक्तपेढीच्या प्रमुख डॉ.स्मिता जोशी आणि वरिष्ठ सल्लागार डॉ.पूर्णिमा राव आदी उपस्थित होते.