पुणे : विधानसभेच्या कसबा व चिंचवड या दोन मतदारसंघांमधील पोटनिवडणुकीसाठी आज, रविवारी मतदान होत आहे. कसब्यात महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर व महायुतीचे हेमंत रासने यांच्यात, तर चिंचवडमध्ये महायुतीच्या अश्विनी जगताप, महाविकास आघाडीचे नाना काटे व बंडखोर अपक्ष राहुल कलाटे यांच्यात प्रमुख लढत होत आहे. अशातच पुण्यातील कसबा विधानसभेत मतदान करा आणि मोफत पुस्तक मिळवा अनोखा उपक्रम राबवण्यात आला आहे. साईनाथ मंडळ ट्रस्ट व संयुक्त प्रसाद मित्र मंडळाच्या वतीने केळकर रस्त्यावर डीएसके चिंतामणी समोर सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. नागरिकांनी मतदान केल्यावर बोटावरची शाई दाखवल्यास त्यांना एक पुस्तक भेट देण्यात येईल. तसेच या उपक्रमाअंतर्गत महिलांच्या हातावर मोफत मेहंदी काढून देण्यात येणार आहे. बहुसंख्य लोकांनी मतदान करावे हा या उपक्रमाचा मूळ उद्देश आहे.
२ मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. कसब्यातील मतमोजणी कोरेगाव मार्क येथील वखार महामंडळाच्या गोदामात होणार आहे. चिंचवडमधील मतमोजणी कामगार भवन, थेरगाव इथे होणार आहे. दोन्ही मतदारसंघांत महाविकास आघाडी व महायुतीने निवडणूक प्रतिष्ठेची केल्यामुळे निकालाबाबत पुणे जिल्ह्यालाच नाही, तर राज्यालाही उत्सुकता आहे.