राजगुरुनगर नगरपरिषेदेची निवडणूक जाहीर झाली आहे. १५ फेब्रुवारी रोजी नगर परिषेदेची प्रारुप मतदारयादी जाहीर करण्यात आली आहे. प्रत्येक वाॅर्डातून नागरिकांनी हरकती दाखल केल्या आहेत. वास्तविक जुने खेड सध्याचे राजगुरुनगर या गावाला पूर्वीपासून २४ वाड्यावस्त्या असल्याने तसेच त्यातील भाग नगर परिषदमध्ये समाविष्ट झालेला आहे. राजगुरूनगर नगर परिषद २०१५ मध्ये अस्तिवात आली. आजुबाजुच्या वाड्यावस्त्यांना सध्या ग्रामपंचायती आहेत. राजगुरुनगर नगर परिषेदेच्या इच्छुक उमेदवारांनी वाड्यावस्त्यांवरील तसेच तालुक्यातील इतर गावामधील मतदारांची त्या त्या वाॅर्डामध्ये नावे घुसवली आहेत. हे मतदार त्या ठिकाणी राहत नाही. नगर परिषद हद्दीतील काही कुटुंबातील घटकांची नावे ग्रामपंचायत हद्दीमध्ये तर काही घटकांची नावे नगर परिषद हद्दीमध्ये आहेत. तसेच अनेक जण ग्रामपंचायत सदस्य , सरपंच तर त्याच घरातील व्यक्ती नगरसेवक आहेत. मतदारयादी करताना किंवा वार्ड रचना करताना कोणत्याही प्रकारे भौगोलिक परिस्थितीचा विचार करण्यात आला नाही. नव्याने वाढणाऱ्या मतदाराकडे आधारकार्ड, रेशनिंग कार्ड किंवा अन्य रहिवासी पुरावा नाही.
नगर परिषद वार्ड क्रमांक १८ मध्ये सुमारे ७०० मतदारांचे असून काही वार्ड हे २१०० मतदाराचे झाले आहेत. ही विषमतादेखील अन्यायकारक होणार आहे. या कामी निवडणूक निर्णय अधिकारी, उपविभागीय अधिकारी यांनी नगर परिषद कर्मचारी यांना नोटिसा दिल्या आहेत. याकामी निवडणूक निर्णय अधिकारी यांना वहीत नमुन्यामध्ये हरकती घेतलेल्या आहेत. परंतु सदरील हरकतींना न्याय मिळण्याची शक्यता कमी आहे. अशा प्रकारे निवडणुका झाल्यास वार्डामध्ये योग्य प्रतिनिधित्व निवडण्याचा त्या त्या वार्डातील मतदारांचा हक्क डावलला जाणार असून बोगस मतदार व बोगस मतदार उमेदवार निवडून येणार आहे. मतदार यादी दुरुस्त करून बोगस मतदारांची नावे वगळावी. याबाबत खेड तालुका भीमशक्ती संघटनेचे अध्यक्ष विजय डोळस यांनी निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला आहे.