पिंपरी : चिंचवड, भोसरी आणि पिंपरी या तिन्ही विधानसभा मतदार संघात उद्या शनिवार (दि.१९) आणि रविवार (दि. २०) नव मतदार नोंदणी जास्तीत-जास्त व्हावी, यासाठी पत्रक वाटण्यात येणार आहे. तसेच या पत्रकावर ऍप डाऊनलोड करण्यासाठी स्कॅनर देण्यात आले आहेत. नवमतदारांनी कोड स्कॅन करून माहिती भरून आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करावे, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी नीलेश देशमुख यांनी केले आहे. तसेच चिंचवड विधानसभा मतदार संघात मतदार यादी शुध्दीकरणाचे काम युध्दपातळीवर सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
शहरातील तिन्ही विधानसभा मतदार संघात नवमतदार नोंदणी, स्थालांतर मतदारासह मतदार यादी शुध्दीकरणाचे काम सुरू आहे. यासाठी चिंचवड मतदार नोंदणी कार्यालयामार्फत सोसायट्यांमध्ये कॅम्प, महाविद्यालयात स्पर्धा घेण्यात येणार आहे. नवमतदारांना कार्यालयात जाण्याची गरज नाही. कोड स्कॅन करून माहिती भरून आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करावे. चिंचवड मतदार संघात घरोघरी बीएलओ भेट देत असून मतदार यादी शुध्दीकरण करण्यात येत आहे.
चिंचवड विधानसभा मतदार संघ हा राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा मतदार संख्या असलेला मतदार संघ आहे. आणखी काही मतदारांची नावे मतदार यादीत नाही, त्यांच्या नावाचा समावेश व्हावा, यासाठी निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार वेळोवेळी जनजगृतीसह विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. नवमतदारांना मतदार यादीत नाव नोंदणी करण्यासाठी त्यांच्या जनजागृती होण्यासाठी तिन्ही मतदार संघात पत्रके वाटण्यात येणार आहेत. तसेच या पत्रकावर ऍप डाऊनलोड करण्यासाठी स्कॅनर देण्यात आले आहेत.- निलेश देशमुख, मतदार नोंदणी अधिकारी