पुणे :विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपावरून राजकीय संघर्ष सुरू झाला असून, आता जिल्हा प्रशासनानेदेखील मतदारयाद्या अद्ययावत करण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार २५ जूनपासून पुढील महिनाभर मतदारांचे सर्वेक्षण, नवीन मतदार नोंदणी करण्यासाठी केंद्रस्तरीय मतदान अधिकारी सज्ज झाले आहेत. याच महिनाभराच्या काळात नवीन मतदारांची नोंदणी तसेच दुबार मतदार वगळणे पत्त्यात तसेच नावांमध्ये दुरुस्ती करणे आदी उपक्रम राबविले जाणार आहेत. तर २५ जुलै रोजी तात्पुरती, तर अंतिम मतदारयादी २० ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
राज्याच्या विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबर रोजी संपत असून, त्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदारयादीचे अद्ययावत करण्याचे निर्देश राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार २५ जून ते २४ जुलै या महिन्यात केंद्रस्तरीय मतदान अधिकारी घरोघरी जाऊन मतदारांची पडताळणी करणार आहेत. मतदार यादीमधील चुकांची दुरुस्ती करणे, फोटो बदलणे, पत्त्यामध्ये तसेच नावांमध्ये दुरुस्ती करणे, मतदान केंद्रांची सीमा निश्चित करणे, भागयाद्यांची पडताळणी करून नव्या मतदान केंद्रांची निर्मिती करणे, असे कामकाज केले जाणार आहे. यानंतर २५ जुलै रोजी तात्पुरती मतदारयादी जाहीर केली जाणार आहे. या मतदारयादीवर ९ ऑगस्टपर्यंत हरकती व सूचना स्वीकारल्या जातील. त्यानंतर १९ ऑगस्टला सुनावणी होऊन २० ऑगस्ट रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध केली जाणार आहे. याच दरम्यान मतदार नोंदणीसाठी विशेष मोहिमा राबविण्यात येणार आहेत.
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी ४ जून रोजी करण्यात आली. त्यानंतर केवळ २० दिवसांमध्येच जिल्हा प्रशासनाला पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज व्हावे लागत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनावरील ताण वाढणार आहे. आचारसंहितेच्या काळात नियमित कामांकडे दुर्लक्ष झाले होते. परिणामी नागरिकांची कामे रखडली होती. आता पुन्हा निवडणुकीचे काम सुरू झाल्याने कामांमध्ये व्यत्यय येण्याची शक्यता आहे.