पुणे : हवेली २११-विधानसभा मतदार संघात ज्या मतदारांची रंगीत छायाचित्रे मतदारयादीत नाहीत अशा मतदारांनी आपले रंगीत छायाचित्र निवडणूक शाखा हवेली तहसील कार्यालय येथे आठ दिवसांच्या आत जमा करावे, असे आवाहन हवेली प्रांत अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी सचिन बारवकर व तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील (हवेली) यांनी केले आहे.
आजपासून ८ दिवसांच्या आत ज्या मतदारांच्या मतदारयादीमध्ये छायाचित्र नसेल अशा मतदारांनी आपले दोन पासपोर्ट रंगीत छायाचित्रासह आधार कार्डची छायांकित प्रत, वीजदेयकाची छायांकित प्रत तहसील कार्यालय हवेली निवडणूक शाखा येथे किंवा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे कागदपत्रे जमा करावेत.
ज्या मतदारांची नावे दुबार झाली आहेत, त्यांनी त्यांची नाव वगळण्याबाबत नमुना नं. ७ चा फॉर्म भरणे तसेच स्थलांतर झालेले, दुबार, मयत, नवीन मतदार इत्यादींची कामे केली जात आहेत. यादीत नाव असूनही छायाचित्र नसणे, पूर्ण माहिती नसणे, तसेच पत्ता अद्ययावत करणे इत्यादीबाबत कागदपत्रे कार्यालयात जमा करावेत. अथवा www.nvsp.in या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज नमुना नं. ८ भरावेत. ज्या मतदारांचे छायाचित्र आठ दिवसांत जमा होणार नाहीत अथवा www.nvsp.in यावर ऑनलाईन अर्ज नमुना ८ मध्ये प्राप्त होणार नाहीत अशा मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे.