पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभर मतदार पडताळणी मोहिम सुरू असून पुणे जिल्ह्यात आतापर्यंत ९२ टक्के मतदारांची पडताळणी झाली आहे. मात्र, सर्वात कमी पडताळणी हडपसर मतदारसंघात झाली आहे. पडताळणीसाठी मतदान क्षेत्रीय कर्मचारी (बूथ लेव्हल ऑफिसर) मिळत नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मतदार पडताळणीची कामे संथगतीने सुरू आहेत. परिणामी, पुणे जिल्ह्यातील २१ पैकी खडकवासला आणि हडपसर मतदारसंघात मतदार पडताळणीची सर्वाधिक कमी कामे झाली आहेत.
जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक शाखेच्या वतीने जिल्ह्यातील २१ मतदारसंघामध्ये मतदार पडताळणीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांकडे बीएलओचे काम करण्यासाठी कर्मचाऱ्यांची मागणी केली होती. त्यासाठी दोनदा स्मरणपत्रे पाठविली. मात्र, दोन्ही महापालिकांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नसल्याची स्पष्ट झाले आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर सुमारे १४०० ते १५०० मतदार आहेत. त्यासाठी घरोघरी जाऊन मतदारांची पडताळणी करायची आहे. २१ मतदारसंघासाठी सुमारे ८ हजार २१३ बीएलओंची गरज आहे. त्यापैकी खडकवासला, पर्वती आणि हडपसर हे तीन मतदारसंघ वगळता सर्व मतदारसंघात सध्या पुरेसे बीएलओ कर्मचारी असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
निवडणुकीचे काम हे राष्ट्रीय काम आहे. तरीही या कामाला कोणीही अधिकारी, कर्मचारी काम करण्यास पुढे येत नाही. या कामासाठी दररोज कर्मचाऱ्यांची गरज नसून महिन्यातून दोन ते तीन दिवस या कर्मचाऱ्यांची गरज आहे. तरीही कर्मचारी काम करण्यास पुढे येत नाही. खडकवासलामध्ये १२५, पर्वतीमध्ये ४० आणि हडपसरमध्ये सुमारे १७५ कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. त्यामुळे काही ठिकाणी काम कमी झाले आहे’, असे जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
हडपसरमध्ये सर्वाधिक कमी पडताळणी
पुणे जिल्ह्यातील २१ मतदारसंघांमध्ये सुमारे ९२ टक्के मतदार पडताळणीचे काम झाले आहे. उर्वरीत आठ टक्के काम बाकी आहे. त्यात सर्वाधिक कमी मतदार पडताळणी ही हडपसर आणि खडकवासला मतदारसंघात झाली आहे. पुणे शहरातील पुणे कँटोन्मेंट, कसबा, शिवाजीनगर मतदारसंघात पडताळणीची कामे सर्वाधिक झाली आहेत. पडताळणी दरम्यान, नवमतदार, दुबार अथवा मयत आणि नावासह स्थलांतरीतांचे अर्ज भरण्याचे काम करायचे आहे.
जिल्ह्यातील २१ मतदारसंघापैकी तीन मतदारसंघातील कामांसाठी पुरेसे बीएलओ उपलब्ध झाले नाही. महापालिकेसह विविध सरकारी कार्यालयांकडे या कर्मचाऱ्यांची मागणी केली आहे. मात्र, कोणीही कर्मचारी उपलब्ध करून देत नाही. त्यामुळे खडकवासला, पर्वती आणि हडपसर या मतदारसंघात मतदार पडताळणीची कामे संथगतीने सुरू आहेत. - मीनल कळसकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी