पिंपरी : विविध राजकीय पक्षांनी आपापल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी यंत्रणा कार्यान्वित केली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, आमदार पंकजा मुंडे यांच्या जाहीर सभा झाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुरुवारी सभा आयोजित केली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एक जाहीर सभा आणि दोन बैठका झाल्या. शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांची भोसरीत रॅली झाली. संपर्कप्रमुख गजानन कीर्तीकर यांची सभा झाली. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची गुरुवारी सांगवी आणि भोसरीत सभा आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याही सभा झाल्या आहेत. पदयात्रा, प्रचार फेऱ्या झाल्या. शेवटचे पाच दिवस उरल्याने उमेदवारांनी काउंटडाऊन सुरू आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना, त्याचबरोबर मनसे, आरपीआय, बहुजन समाज पक्षाच्या उमेदवारांनी गेल्या आठ दिवसांत आपापल्या परीने प्रचाराला वेग दिला आहे. मतदारसंघ पिंजून काढण्यासाठी सकाळी ७ वाजल्यापासून पदयात्रा, कोपरा सभा, फेरी या माध्यपासून रात्री उशिराच्या बैठकांनी दैनंदिन प्रचाराची सांगता होत आहे. रात्रंदिवस एक करून उमेदवार आणि कार्यकर्ते प्रचारात व्यस्त आहेत. मतदान जवळ येऊ लागले आहे, काउंटडाऊन सुरू आहे.आॅटो रिक्षांवर ध्वनिक्षेपक लावून, एलईडी स्क्रीन लावलेल्या वाहनांवरून प्रचार सुरू आहे. जे उमेदवार आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत, ते कार्यकर्त्यांसमवेत पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे गल्लोगल्ली फिरून मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. जाहिरातफलक लावलेली वाहने फिरवणे, गाजावाजा करण्याची ऐपत नसलेल्यांनी मतदारांशी संवाद साधण्यासाठी पायपीट करणे पसंत केले आहे. (प्रतिनिधी)
मतदार गाठीभेटींवर उमेदवारांचा भर
By admin | Published: October 09, 2014 5:29 AM