मतदारांनो भावनिक न होता विकास डोळ्यापुढे ठेवून मतदान करा : उपमुख्यमंत्री अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2024 09:56 PM2024-05-04T21:56:17+5:302024-05-04T21:57:04+5:30
अजित पवार म्हणाले, केंद्र आणि राज्य सरकार शेतकर्यांना ६ हजार रुपये अर्थसहाय्य देते. महिलांना उज्वला गॅस योजना देण्यात आली. नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान दिले. ऊसाची एफआरपी वाढविली.
बारामती - डोर्लेवाडी दि ४ (प्रतिनिधी) बारामतीच्या मतदारांनी भावनिक न होता विकास डोळ्यापुढे ठेवून मतदान करावे. मी भावनिक होऊन मते मागत नाही. विकासकामे पूर्ण करण्यासाठी मदत मागत आहे, विकास डोळ्यांपुढे ठेवून मतदान करा असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
डोर्लेवाडी (ता. बारामती) येथे महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन शनिवारी (ता. ०४) सकाळी करण्यात आले होते. यावेळी अजित पवार बोलत होते. यावेळी रासप नेते माजी मंत्री महादेव जानकर उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, केंद्र आणि राज्य सरकार शेतकर्यांना ६ हजार रुपये अर्थसहाय्य देते. महिलांना उज्वला गॅस योजना देण्यात आली. नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान दिले. ऊसाची एफआरपी वाढविली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची चांगली ओळख झाल्याने मतदारसंघातील विकासकामे मार्गी लावण्यासाठी त्याचा उपयोग होणार असल्याचे अजित पवार म्हणाले.
रासपचे प्रमुख महादेव जानकर म्हणाले,डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेले देशाचे संविधान कोणी बदलणार नाही.विरोधक याबाबत खोटा प्रचार करीत असल्याचे जानकर म्हणाले.
यावेळी मदन देवकाते,विश्वास देवकाते माजी , प्रशांत काटे , किरण तावरे , संभाजी नाना होळकर , राजेंद्र गावडे , ॲड.दिलीप धायगुडे , राहुल झारगड , पांडुरंग कचरे , डोर्लेवाडी गावचे सरपंच सुप्रिया नाळे,उपसरपंच छबूबाई मदने सर्व ग्रामपंचायत सदस्य , माऊली अण्णा नाळे,रमेश मोरे, बापू गवळी,अविनाश काळकुटे, भगवान शिरसागर , वसंतराव काळकुटे,अशोकराव घोरपडे, श्रीपती जाधव आदी उपस्थित होते.ॲड .संजय नाळे व ॲड.पंढरीनाथ नाळे यांनी सूत्रसंचालन केले, तर आभार विनोद नवले यांनी मानले.
....त्याच वेळी आपला सुपडासाफ झाला असता
२०१४ च्या निवडणुकीत खडकवासला येथे आपण थोडक्यात बचावलोे.त्यावेळी महादेव जानकर हे कमळ चिन्हावर निवडणुक लढले असते तर आपला सुपडासाफ झाला असता.लोकांना मतदान केंद्रावर कपबशी चिन्हाचे मतदान कमळाला जात असल्याचे समजत नव्हते.
महादेव जानकर यांचे भाषण सुरु होते.यावेळी ते अजित पवार यांना मनमोकळा,भाबडा माणुस असे म्हणण्याएेवजी भामटा असे चुकुन बोलले.ती चुक लक्षात आल्यानंतर त्यांनी ती दुरुस्त केली.ते म्हणाले,अजितदादा कोणतेही काम होणार असेल तर तोंडावर सांगतात,असे जानकर म्हणाले.