पुणे : मतदार यादीतील घोळ निस्तारण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी लोकसभेच्या निवडणुकीनंतर दमदार पाऊले उचलली असली, तरी वास्तवात घोळ संपत नसल्याचे दिसून येते. एकाच घरातील एकाच पत्त्यावर राहणाऱ्या चार मतदारांना तीन वेगवेगळी मतदान केंद्रे देण्याचा आणि ओळखपत्रांवर वेगवेगळे पत्ते छापण्याचा पराक्रम निवडणूक यंत्रणेने केला आहे.डॉ. आनंद कामत (मोहित हाईट्स, आगरवाले कॉलनीजवळ, भवानी पेठ) यांचे मतदान केंद्र मीरा हाउसिंंग सोसायटीतील आनंद पार्क येथे असून, त्यांच्या मुलीसाठी सापिका कॉर्नर येथील महावीर कॉम्प्लेक्स हे केंद्र देण्यात आले आहे. त्यांच्या मुलासाठी आणि पत्नीसाठी कासेवाडी येथील कामनगर मित्रमंडळ हे मतदान केंद्र देण्यात आले आहे.कामत यांनी सांगितले, की लोकसभेच्या निवडणुकीत मतदार यादीतून नाव गहाळ झाल्याने आम्ही फॉर्म क्रमांक ६ भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाकडे ३० जून रोजी भरून दिला होता. हा अर्ज दिल्यानंतर १२ आॅगस्ट रोजी पालिकेच्या नव्या प्रशासकीय इमारतीमधील अधिकाऱ्याची भेट घेण्यास सांगण्यात आले. मात्र संबंधित अधिकाऱ्याने संगणकाच्या सॉफ्टवेअरवर आमच्या पत्त्याचा आढळ होत नसल्याने जवळच्या पत्त्याचा पर्याय घेण्यास सांगितले, पण त्यास मी नकार दिला. त्यानंतर निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर या वैचित्र्याबद्दल तक्रार केली, मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही.डॉ. कामत यांनी याबद्दल संताप व्यक्त केला. ते म्हणाले, की आम्हा सर्वांचा पत्ता एकच असूनही वेगवेगळी केंद्रे देण्यात आल्याचे तसेच ओळखपत्रांवर वेगवेगळे पत्ते असल्याचे लक्षात आले. आमच्या खऱ्या पत्त्यानुसार आम्हाला भवानी पेठेतील नवीन हिंंद हायस्कूल हे केंद्र असणे अपेक्षित आहे. (प्रतिनिधी)
एकाच कुटुंबातील मतदारांना वेगवेगळी केंद्रे
By admin | Published: October 15, 2014 5:13 AM