पिंपरी : यंदाची महापालिकेची निवडणूक ही खऱ्या अर्थाने ‘हायटेक’ ठरत आहे. स्लीप न मिळाल्यामुळे मतदान केंद्राकडे पाठ फिरविणाऱ्या मतदारराजाला मतदानासाठी बाहेर काढण्याकरिता अनोखी क्लृप्ती लढविण्यात आली आहे. व्हॉट्सअॅपवरच कुटुंबातील सर्व सदस्यांचा मतदान क्रमांक आणि केंद्र कुठे आहे, याचा तपशील पाठविण्याची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. घरबसल्या ही माहिती मिळाल्यामुळे मतदारही सुखावले असून, मतदानाचा टक्का वाढविण्याच्या या ‘हटके’ प्रकाराची सर्वत्र चर्चा सुरू आहे.कोणत्याही निवडणुकीत कितीही चांगल्या प्रकारे नियोजन केले, तरी ऐनवेळी मतदार स्लीप वेळेत न मिळणे, मतदार यादीत नाव नसणे, मतदान केंद्र शोधण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ येणे, अशा प्रकारांना नेहमीच मतदारांना सामोरे जावे लागते. मतदान केंद्रावर विविध पक्षांचे कार्यकर्ते मतदानाच्या दिवशी मतदारांना त्यांचा क्रमांक आणि केंद्र यांची माहिती देण्यासाठी केंद्राच्या बाहेर ठाण मांडून बसलेले असतात. त्यांची ही सहकार्याची भूमिका असूनही मतदार स्लीप न मिळाल्यामुळे अनेक मतदार मतदान करण्यास फिरकत नाहीत. मतदान हा लोकशाहीने दिलेला मूलभूत हक्क आहे; मात्र तो बजावलाच गेला पाहिजे, अशी भावना अनेकांच्या मनात डोकावत नाही. मतदार घराबाहेरच पडले नाहीत, तर हक्काची व्होटबँक हातातून जाईल, याच जाणिवेतून मतदारांची पावले केंद्राकडे वळविण्यासाठी पक्षाकडून ही क्लृप्ती लढविण्यात आली आहे. (प्रतिनिधी) टेक्नॉसॅव्ही’ मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी पक्षांनी व्हॉट्सअॅपचा सहारा घेतला आहे. एक ते दोन आठवडे आधी स्लीपचे वाटप घरोघरी केली जाते; मात्र त्या क्वचितप्रसंगी गहाळ होण्याची भीती असते. व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठविल्यास तो सेव्ह राहत असल्यामुळे तो पाहून त्या दिवशी थेट केंद्रावरच येऊन नागरिक मतदान करू शकतात. ज्यांना स्लीप मिळू शकलेली नाही, त्यांचाही मतदान केंद्रावर येऊन यादीत नाव शोधणे, केंद्र शोधण्यासाठीचा वेळ वाचणार असल्याचे कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले.
व्हॉट्स अॅपवरच मतदार ‘स्लीप’
By admin | Published: February 18, 2017 3:10 AM