नसरापूर : पुणे सातारा महामार्गावरील कोंडीमुळे सुमारे १५ पेक्षा अधिक किलोमीटर अंतरापर्यंत वाहतूक कोंडी झाल्याने गावाकडे मतदानासाठी निघालेल्या मतदारांची कुचंबना झाली आहे.मोठ्या प्रमाणावर सकाळ पासून वाहतूक कोंडीत अडकले आहेत. आपले मतदान होते की नाही या काळजीत मतदार पडले आहेत. शिवरे व खेड शिवापूर येथील उड्डाणपुलाची कामे निखिल कन्स्ट्रक्शन या ठेकेदार कंपनीने घेतली असून अत्यंत धिम्या गतीने या पुलाची कामे सुरु आहेत.
या महामार्गावर मोठ्या झालेल्या वाहतूक कोंडी साठी महामार्ग वाहतूक पोलिस व राजगड वाहतूक पोलीस वाहतूक सुरळीत करण्याकरिता दिसून आले नाहीत. पुणे मुंबई कडून सातारा, सांगली, कोल्हापूर, महाबळेश्वरकडे जाणाऱ्या वाहने उलटसुलट जात असल्याने वाहतूक कोंडीत आणखीन भर पडली आहे. याकरिता प्रशासनाने कायम दुर्लक्ष केले असून कामाच्या ठिकाणी रस्त्याच्या कामाचा बोजवारा उडाल्याने वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. गावाकडे जाणारे मतदारांना आपले मतदान होईल की नाही ? या चिंतेत असल्याचे दिसून आले. शिवरे येथील उड्डाणपुलाचे काम करणारे निखिल कन्स्ट्रक्शन कडून कामात सुधारणा होत नसल्याने प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होत आहे. वाहतूक कोंडीत अनेक रुग्णवाहिका अडकली होती. तरीही या प्रश्नासाठी वेळ न देता प्रशासनाने कायम कानाडोळा केला आहे.