पुणे : महापालिकेच्या ४ १ प्रभागांतील १६२ जागांसाठी २६ लाख ४२ हजार मतदार असून प्रशासन आता या मतदारयादीचे एका मतदान केंद्रावर सुमारे ८०० मतदार याप्रमाणे विभाजन करीत आहेत. पालिका निवडणुकीचा एकूण खर्च साधारण २२ कोटी रुपये होईल असा प्रशासनाचा प्राथमिक अंदाज आहे. हा सर्व खर्च पालिकाच करणार आहे. निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी विभागीय आयुक्तांकडून वरिष्ठ अधिकारी देण्यात येणार असून अन्य कर्मचारी नियुक्तीसाठी निवडणूक शाखा प्रयत्नशील आहे. प्रत्येकी ३ मतदार केंद्रांसाठी एक याप्रमाणे एकूण ३९ प्रभागांसाठी १३ व ३ सदस्यांच्या २ प्रभागांसाठी १ असे एकूण १४ निवडणूक अधिकारी राज्य सरकार विभागीय आयुक्तांमार्फत नियुक्त करणार आहे. या निवडणूक अधिकाऱ्यांना प्रत्येकी ४ सहायक निवडणूक अधिकारी असतील. त्यातील पहिले २ तहसीलदार असतील. दुसरे दोन पालिकेचे सहायक आयुक्त व कार्यकारी अभियंता असतील. एका मतदान केंद्रावर सुमारे ८०० मतदार असावेत अशा आयोगाच्या सूचना आहेत. त्याप्रमाणे मतदार याद्यांचे विभाजन करण्यात येत आहे. त्यानंतर मतदान केंद्र किती होतील ते निश्चित होईल. (प्रतिनिधी)
मतदार साडेसव्वीस लाख, निवडणूक खर्च २२ कोटी
By admin | Published: January 13, 2017 3:47 AM