पुणे : मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह कार्यकर्त्यांकडून पैशांचे प्रलोभन दाखविण्यास सुरुवात झाली आहे. मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास कोथरूड येथील साईनाथ नगरमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून पैसे वाटप सुरू असल्याचा प्रकार सतर्क पोलिसांनी उघडकीस आणला. याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली असून, ३१ हजार १०० रुपयांची रोकड जप्त करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत कांबळे यांनी दिली.अभिजित मोहन जगताप (वय ३३, रा. साईनाथ वसाहत, कोथरूड), सुभाष दामू शिंदे (वय ४२, रा. कोथरूड), सतीश कोंडिबा सावंत (वय ३७, रा. केदार एम्पायरजवळ, कर्वे रस्ता, कोथरूड) अशी अटक आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस नाईक ए. एस. तळोले यांनी फिर्याद दिली आहे. राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते साईनाथनगरमध्ये मतदारांना पैसे वाटप करीत असल्याची माहिती कोथरूड पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार कोथरूड पोलिसांनी साईनाथनगरमध्ये धडक मारली. त्या वेळी जगताप, शिंदे आणि सावंत हे मतदारांना पैसे वाटत होते. पोलिसांनी या तिघांनाही ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. त्यांच्याकडून ३१ हजार १०० रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. ही रक्कम राष्ट्रवादीचे बापू ढाकणे यांनी मतदारांना वाटण्याकरिता दिल्याचे आरोपींनी पोलिसांना सांगितले आहे. त्यानुसार कोथरूड पोलिसांनी कलम १८८, १७१ (इ), ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. कोथरूड पोलिसांकडून दारूव पैशांच्या वाटपावर विशेष लक्ष ठेवण्यात येत असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनांनुसार पोलीस कर्मचाऱ्यांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत कांबळे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
मतदारांना अमिष; कार्यकर्ते अटकेत
By admin | Published: October 15, 2014 5:13 AM