पुणे : सासवड येथील पुरंदर तहसीलदार कार्यालयातून मतदानयंत्र चोरीला गेल्याच्या घटनेचा अहवाल जिल्हा प्रशासनाने विभागीय आयुक्तालयाकडे देण्यात आला आहे. विभागीय आयुक्त, तसेच विशेष पोलिस महानिरीक्षकांचा अहवालही मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना सुपुर्द करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली. या घटनेनंतर मतदानयंत्रांबाबतची सुरक्षाव्यवस्था चोख ठेवण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.
निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात ईव्हीएम जनजागृती कार्यक्रम सुरू आहे. ही यंत्रे उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अखत्यारीत गोदामात ठेवण्यात आली आहेत. ईव्हीएम यंत्रांच्या सुरक्षिततेबाबत योग्य तो पोलिस बंदोबस्त ठेवून सुरक्षेबाबत काळजी घेण्याचा आदेश निवडणूक आयोगाने वेळोवेळी दिला आहे. मात्र, सासवड येथील जनजागृतीसाठी देण्यात आलेले मतदानयंत्र चोरीला गेल्याची घटना गेल्या आठवड्यात घडली होती. त्यानंतर सुरक्षाव्यवस्थेत ढिलाई ठेवल्यावरून जिल्हा प्रशासनातील प्रांताधिकारी, तहसीलदार, तर पोलिस दलातील उपविभागीय पोलिस अधिकारी, अशा तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले होते. त्यापूर्वी दोन सुरक्षारक्षकांचे निलंबन करण्यात आले आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांनी ही कारवाई केली होती, तर आयोगाने याबाबत राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार व कोल्हापूर विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांना स्वतंत्र अहवाल देण्याचा आदेश दिला होता, तर पुलकुंडवार यांनीही जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांना अहवाल देण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार विभागीय आयुक्तांनी मागविलेला अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी पाठवून दिला आहे, तसेच विभागीय आयुक्त व विशेष पोलिस महानिरीक्षकांचाही अहवाल पाठविण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
सासवड येथील घटनेनंतर मतदानयंत्रांच्या सुरक्षिततेबाबत स्वत: स्थळाची पाहणी करून आढावा घेतला. पोलिस प्रशासनालाही चोख बंदोबस्त ठेवण्याच्या आणि याकरिता स्वतंत्र मनुष्यबळ देण्याच्या सूचना दिल्या आहेत. मतदानयंत्रे चोरी प्रकरणाचा अहवाल निवडणूक आयोग आणि विभागीय आयुक्तालयाला पाठवून दिला आहे.
-डॉ. सुहास दिवसे, जिल्हाधिकारी